लोकसत्ता टीम

नागपूर: दिवाळीचा सन काही दिवसांवर आला असतांनाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटीनिमित्त मिळणारे सानुग्रह अनुदान मिळाले नाही. त्यातच एसटीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना वेतन ७ तारखेपूर्वी केला जात असल्याचा महामंडळाचा दावा आहे. परंतु दिवाळीनिमित्त यंदा वेतनाबाबत महत्वाची माहिती पुढे येत आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

देशासह राज्यात २८ ऑक्टोबरपासून सर्वत्र दिवाळी या सणाला सुरूवात होणार आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच रेल्वे प्रशासन, राज्यातील मुंबईसह इतरही काही मोठ्या महानगर पालिका, राज्यातील अनेक खासगी कार्यालयात आपापल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट किंवा बोनस स्वरूपात काही रक्कम जाहीर करते. काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर देखील करण्यात आला आहे. असे असताना राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचारी मात्र आजही दिवाळी भेट, बोनसच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा-Nitin Gadkari : VIDEO : “राजकीय नेत्यांना त्यांच्या मुलांच्या तिकीटाची चिंता, पण आम्हाला…”; नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

दरम्यान यंदाच्या दिवाळी बोनसमध्ये काहीअंशी वाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देऊन दिवाळी भेट देण्याची घोषणा झाली होती. परंतु अद्याप काही झाले नाही. यंदा दिवाळी २८ ऑक्टोबरला आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा दरमहिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. मात्र त्यापूर्वी येणाऱ्या दिवाळीत आर्थिक खर्च, सणांसाठीची खरेदी कशी करायची असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांसमोर आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी ५५ कोटींचा निधी तातडीने द्या, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आला असताना एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या बोनसचे ६ हजार रूपये मिळाले नसल्याने तो कधी मिळणार हा प्रश्नही एसटी कर्मचारी काँग्रेसतर्फे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे. त्यातच शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सप्टेंबर २०२४ या महिन्यातील सवलतीमूल्याच्या प्रतिपूर्तीसाठी ३५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी एसटीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे वेतन होण्याचे संकेत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी (२५ ऑक्टोंबर) मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत बैठक आहे. त्यात काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा-रिसोडमध्ये पुन्हा दोन कुटुंबातील पारंपरिक लढत?; अमित झनक सलग चौथ्यांदा काँग्रेसकडून रिंगणात

…तर दिवाळीत संघर्ष करणार

“एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून वेतन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोबत कर्मचाऱ्यांना बोनससाठी तातडीने शासनाने ५२ कोटींचा निधी देण्याची गरज आहे. हा निधी न मिळाल्यास आचार संहितेतही एसटी कर्मचाऱ्यांना हक्कासाठी संघर्ष करावा लागेल. ही पाळी शासनाने येऊ देऊ नये.’’ -श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.