अकोला : मूळ अकोलेकर असलेले वरिष्ठ अधिकारी श्रीकांत जाधव यांनी हरियाणा पोलीस दलात प्रभावी कामगिरी केली आहे. गुन्हेगारी, तस्करी रोखण्यासह, व्यसनमुक्ती व सामाजिक कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी स्व.राम जाधव यांचे श्रीकांत हे सुपुत्र आहेत. जाधव १९९४ च्या आयपीएस तुकडीचे पोलीस अधिकारी आहेत. हरियाणा पोलीस दलात ते २८ वर्षांपासून सेवा देत आहेत. सध्या ते हरियाणा राज्य अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या ( नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर कार्यरत आहेत. जाधव यांनी फतेहाबाद येथून विशेष व्यसनमुक्ती अभियान सुरू केले. हे अभियान एक हजार कुटुंबापर्यंत पोहोचून अनेकांना व्यसनमुक्त केले.
हेही वाचा >>> Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर
आता हे कार्य अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागात चंदीगढ, दिल्ली व जम्मू येथे कार्यरत असताना २००३ ते २००७ पर्यंत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले. हिमाचलमध्ये अंमली पदार्थाची शेती नष्ट केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणारी अंमली पदर्थाची तस्करी रोखली. दीड हजार बेवारस गोवंशांना त्यांनी सुरक्षित गोशाळेत पोहोचवले. एक गाव दत्तक घेण्याची योजना त्यांनी सुरू केली. यामध्ये त्यांनी मंडोटी हे गाव दत्तक घेतले. त्या गावात दोन गटात संघर्ष होऊन २२ हत्या झाल्या होत्या. जाधव यांनी आरोपींना अटक करून गावाला दहशतीतून मुक्त केले. गुन्हेगारीवर नियंत्रणासह पोलीस मित्र अभियानसुद्धा त्यांनी राबवले. पोलीस ठाण्यात ‘बार कोड’ लावून कामात पारदर्शकता आणली. याशिवाय त्यांनी विविध सामाजिक कार्य केले. जाधव यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना वर्ष २०२२ साठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. मूळ अकोलेकराचा हरियाणातील कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मान होत असल्याने आनंद व्यक्त होत आहे.