कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने दर्शन देत धडकी भरवणाऱ्या मादी बिबट्याला अखेर वनखात्याच्या चमूने जेरबंद केले. वैद्यकीय तपासणीनंतर अवघ्या २४ तासात त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त देखील केले. वन्यप्राणी कायमचा बंदिस्त न करता त्यालाही मोकळा श्वास घेण्यासाठी खात्याने घेतलेल्या पुढाकाराचे वन्यजीव अभ्यासकांनी स्वागत केले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी – मुनगंटीवार

वन्यप्राण्यांमुळे संघर्षाची स्थिती उद्भवल्यास तातडीने त्याला जेरबंद केले जाते. या बंदिस्त वन्यप्राण्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, एकदा प्राणी जेरबंद झाला की तो कायमचा, असाच आजपर्यंतचा अनुभव आहे. कातलाबोडी, तास येथील वाघिणींना जंगलात सोडण्याची मोजकीच उदाहरणे आहेत. बऱ्याच वर्षानंतर नागपूर वनखात्याने पुन्हा एक चांगली सुरुवात केली आहे. कोराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्र परिसरात गेल्या दीड महिन्यापासून हा बिबट कामगारांना दिसत होता.

हेही वाचा >>>नागपूर : कुलगुरूंचा न्यायालयात माफीनामा !, डॉ. काशीकर प्रकरणी चपराक

कधी एक तर कधी दोन तर कधी तीन बिबट असल्याचे कामगार म्हणत होते. प्रत्यक्षात या परिसरात एकच बिबट होता. गेल्या दीड महिन्यापासून वनखात्याची चमू त्याच्या मागावर होती. या चमूत वनपाल निशिकांत वाघ, कुरेशी, वनरक्षक सरदार, हरीश किनकर, समीर नेवारे, विलास मंगर, बंडू मंगर, चेतन बारस्कार, आशीष महल्ले यांचा सहभाग होता. मुख्य वन्यजीव रक्षकांनी दिलेल्या परवानगीनंतर बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात पिंजरे लावण्यात आले. मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाला. बुधवारी सकाळी त्या मादी बिबट्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून मूळ अधिवासात त्याला मुक्त करण्यात आले.

हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेची रोखे बाजारात कोट्यवधींची गुंतवणूक

नागपूर वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यवाही करण्यात आली. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना सहाय्यक वनसंरक्षक एस.टी. काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमाने, रिना राठोड, विजय गंगावणे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे होते.

Story img Loader