अकोला : नववर्ष २०२५ मध्ये आकाशात नवी नवलाई अनुभवता येईल. चंद्र-सूर्य ग्रहणे, उल्का वर्षाव, धुमकेतू, ग्रह ताऱ्यांची युती- प्रतियुती, ग्रह दर्शन, राशी भ्रमण, सुपरमूनची पर्वणी नव्या वर्षात लाभेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली. नव्या वर्षांत चंद्र आणि ग्रह यांची युती दरमहा घडेल. ग्रह व त्यांची युती एक अनोखी अनुभूती असते. ही स्थिती १८ जानेवारीला पश्चिमेस शुक्र व शनी, २५ फेब्रुवारीला बुध व शनी, ११ मार्चला बुध व शुक्र, १० व २५ एप्रिल रोजी बुध व शनी, शुक्र आणि शनी, ८ जुनला बुध व गुरु, १४ ऑगस्टला गुरु आणि शुक्र एकमेकांच्या जवळ येतील.
तुटणाऱ्या ताऱ्यांच्या स्वरूपात विविधरंगी उल्का वर्षारंभी ३ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २८ जुलै, १२ व १३ ऑगस्ट, ५, १२ व १७ नोव्हेंबर, १४ व २२ डिसेंबरच्या रात्री होईल. पौर्णिमेला पृथ्वीपासून चंद्रजवळ असतो, तेव्हा चंद्रबिंब मोठ्या आकाराचे व अधिक प्रकाशित दिसते. यावर्षी ७ ऑक्टोबर, ५ नोव्हेंबर आणि ५ डिसेंबरच्या रात्री बघता येईल. कार्तिक पौर्णिमेला वर्षातील सर्वात मोठा व अधिक प्रकाशमान चंद्र असेल.पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार फिरताना, या दोन्हीतील अंतर कमी अधिक होत असते. येत्या ४ जानेवारीला हे अंतर १४ कोटी ७० लाख कि.मी.राहील, तर ४ जुलैला हे अंतर १५ कोटी २० लाख कि.मी.असेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
हेही वाचा…“युपीएससी” मुलाखतीसाठी दिल्लीत निःशुल्क ‘अभिरुप मुलाखत प्रशिक्षण’
आकाशात चंद्र, सूर्य आणि ग्रह फिरतात, त्याला राशीचक्र म्हणतात. चंद्र एका राशीत सव्वा दोन दिवस, सूर्य आणि शुक्र एक महिना, तर गुरु ग्रह एक वर्ष व शनीस अडीच वर्षे लागतात. २९ मार्चला शनी ग्रह कुंभ राशीतून मीन राशीत तर गुरु ग्रह १४ मे रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत येईल. सध्या पश्चिमेस तेजस्वी शुक्राचा अस्त १९ मार्चला, पुढे पूर्वोदय २६ मार्च होईल. त्यानंतर १३ डिसेंबरला पूर्वेस अस्त आणि सध्या पूर्वेस दिसणाऱ्या गुरुचा अस्त १३ जुनला तर पूर्वोदय पहाटे ६ जुलैला होईल. मंगळ ग्रहाचा ६ नोव्हेंबरला पश्चिमेस अस्त तसेच सध्या पश्चिमेस दिसणाऱ्या शनी ग्रहाचा अस्त २७ फेब्रुवारीला होऊन ३१ मार्च रोजी पूर्वेस उदय होईल. दक्षिण आकाशात दिसणारी रंगीबेरंगी अगस्त्य तारका १५ मे रोजी अस्त होऊन ९ ऑगस्टला उदय पावेल. धुमकेतू मे आणि जूनमध्ये पृथ्वी जवळ येतील. संपूर्ण महाराष्ट्रात ३ मेपासून ३१ मे पर्यंत दक्षिणोत्तर सरकणारे शून्य सावली दिवस आणि मानव निर्मित आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्र, महाकाय हबल दुर्बीण, ‘स्टारलिंक’ आदी आकाश नजारे सुद्धा पाहता येईल, असे दोड म्हणाले.
ग्रहणे चार, मात्र दिसणार एकच
नव्या वर्षात सूर्य-चंद्राची प्रत्येकी दोन अशी एकूण चार ग्रहणे आहेत. त्यातील एकच ७ सप्टेंबर रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण सुमारे साडेतीन तास बघता येईल. १४ मार्चचे खग्रास चंद्रग्रहण, २९ मार्च आणि २१ सप्टेंबरचे खंडग्रास सूर्यग्रहण मात्र भारतात दिसणार नाही.