लोकसत्ता टीम
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शुक्रारी पार पडला. संपूर्ण देशात एकाच वेळी ४ जूनला सर्व मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे. तत्पूर्वी निकालाचे अंदाज बांधले जात आहे. नागपूरमध्येही भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधणार की परिवर्तन होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघाचा १९५२ पासूनचा इतिहास बघितला तर फक्त एकानेच हॅट्रिक साधली आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिली लोकसभा निवडणूक १९५२ मध्ये झाली. तेव्हापासून तर नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची नावे बघितली तर या मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. पण इतर पक्षाच्या उमेदवारांनाही नागपूरच्या मतदारांनी अनेक वेळा संधी दिली आहे. नागपूरच्या पहिल्या खासदार या काँग्रेसच्या अनुसयाबाई काळे होत्या. त्या १९५२ आणि १९५७ च्या सलग दोन निवडणुका जिंकल्या होत्या. दोन वेळा निवडणुका जिंकणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांचाही समावेश आहे. त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यापूर्वी जांबुवंतराव धोटे यांनीही दोन वेळा नागपूरमधून निवडणूक जिंकली. पण त्यांचा विजय सलग निवडणुकांमधील नव्हता. १९७१ ला ते प्रथम खासदार झाले व त्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते त्यानंतर झालेल्या १९८० च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले.
आणखी वाचा-खासगी हवामान अंदाजावर नियंत्रण कुणाचे? राज्यात सुळसुळाट, शेतकरी संभ्रमात
बनवारीलाल पुरोहित यांनी १९८४ आणि १९८९ अशा दोन लोकसभा निवडणुका काँग्रेसकडून जिंकल्या होत्या. पण त्यांना सलग तिसरी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. १९९६ मध्ये ते भाजपकडून तिसऱ्यांदा निवडणूक लढले व जिंकले. पण त्यांचा हा विजय सलग नसल्याने ती विजयाची हॅट्रिक ठरली नाही. ७२ वर्षात फक्त काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार अपवाद आहेत. त्यांनी सलग चार वेळा निवडणुका जिंकल्या. १९९८,१९९९,२००४ अशा तीन सलग निवडणुका जिंकून त्यांनी हॅट्रिक साधली. त्यांनत २००९ मध्ये ते चौथ्यांचा विजयी होत लोकसभा विजयाचा चौकार त्यांनी मारला. सध्या तरी हा विक्रम मुत्तेमवार यांच्याच नावावर आहे. गडकरी सध्या हॅट्रिक साधण्याच्या निर्णायक काळात आहे. २०१४,२०१९ ची निवडणूक जिंकली, २०२४ ची निवडणूक जिंकली तर ते नागपूरमध्ये हॅट्र्क साधणारे दुसरे नेते ठरतील. त्यामुळे सर्वांचेच लक्ष सध्या ४ जूनच्या मतमोजणीकडे आहे. गडकरी हॅट्रिक साधणार की परिवर्तन होणार या प्रश्नाचे उत्तर त्यादिवशी मिळणार आहे.