लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस दलात बदल्याचे वारे सुरु असल्याने नागपुरातील जवळपास ६० पोलीस निरीक्षकांची बाहेर जिल्ह्यात बदली झाली. त्यामुळे नागपूर शहरातील जवळपास ८० टक्के पोलीस ठाण्याचा कारभार रामभरोसे आहे. पोलीस ठाण्यात ठाणेदाराची नियुक्तीच नसल्यामुळे तक्रारदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यभरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक जिल्हा पोलीस दल आणि पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची अदलाबदल करण्यात येत आहे. नागपुरातील अर्धअधिक पोलीस निरीक्षक पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आयुक्तालयात पाठविण्यात आले तर तेथील पोलीस निरीक्षकांना नागपुरात बदलीवर पाठविण्यात आले. नुकताच झालेल्या बदल्यांच्या यादीत ५० टक्के अधिकारी ठाणेदार म्हणून कार्यरत होते. तर काही ठाणेदारांना तीन वर्षांचा कालावधी शहरात पूर्ण झाल्याने साईड पोस्टींग देण्यात आली.

आणखी वाचा-वडिलांच्या मृत्यूमुळे कैद्याने मागितली ७ दिवसांची सुट्टी, मिळाली १ दिवस, उच्च न्यायालय म्हणाले…

शहर आयुक्तालयात नुकताच झालेल्या ठाणेदारांच्या बदल्यामुळे शहरातील ८० टक्के पोलीस ठाण्यांचा प्रभारी अधिकारी नाही. अनेक पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून ठाणेदार कार्यमुक्त झाले आहेत. पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी नसल्यामुळे तक्रारदारांची हेळसांड होत आहे. अनेक तक्रारदारांची तक्रार न घेता आल्यापावली बोळवण केल्या जात आहे. तर काही ठाण्यात कनिष्ठ अधिकारी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार निर्माण करून मनमानी कारभार करीत असल्याची चर्चा आहे. सध्या अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस ठाण्यात रामभरोसे कारभार सुरु आहे. नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र कुमार सिंघल यांनी अद्यापर्यंत पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी दिले नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील कारभार ढेपाळला आहे.

आणखी वाचा-न्यायाधीशासोबतच घातला वाद, वकिलाला मिळाली ‘ही’ शिक्षा…

सेवाजेष्ठ-अनुभवी निरीक्षकांना संधी?

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अगदी नवख्या असलेल्या पोलीस निरीक्षकांना थेट ठाणेदारी दिली होती. ठाणेदारीचा अनुभव नसल्यामुळे अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता सेवाजेष्ठ आणि अनुभवी पोलीस निरीक्षकांना नवे आयुक्त डॉ. सिंघल संधी देतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In 80 percent of the police stations in nagpur city there are no officers in charge adk 83 mrj