अधीक्षकांविरोधात वाढती धुसफूस
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर कार्यालयाशी निगडित अधिकाऱ्यांना डाववले जात असून लाचलुचपत प्रकरणाचा तपास चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. नवीन अधीक्षकांच्या अशा कार्यप्रणालीमुळे त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याच विरोधात धुसफूस वाढत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मे-२०१५ मध्ये राज्यातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांची इकडून तिकडे बदली करण्यात आली. त्यामुळे नागपुरातील एसीबीचे तत्कालीन अधीक्षक प्रकाश जाधव यांना लोणावळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठवण्यात आले, तर चंद्रपूरचे अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे नागपूर एसीबीची जबाबदारी सोपवण्यात आली. जैन यांनी १८ मे रोजी नागपूर एसीबी अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील प्रकरणात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाला जुमानणारे नाही, परंतु काहीच दिवसात त्यांना आपल्या भूमिकेचा विसर पडल्याचे ‘कल्पना पांडे’ यांच्या प्रकरणावरून दिसले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एसीबीच्या नागपूर कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांमध्ये कमालीची अशांतता पसरली आहे. याचे कारणही, अधीक्षक राजीव जैन हेच असल्याचे सांगण्यात येत आहे. राजीव जैन हे नागपूर एसीबीला रुजू झाल्यापासून नागपूरच्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवून येणाऱ्या तक्रारींचा तपास वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया येथील अधिकाऱ्यांकडे सोपवत असल्याचे सांगण्यात येते. राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत पन्नासवर प्रकरणे हाताळण्यात आली. त्यापैकी पस्तीसवर प्रकरणांमध्ये चंद्रपूर, वर्धा आणि गोंदिया येथील जबाबदारी सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अधीक्षकांना आपल्यावर विश्वास नसेल तर आपले एसीबीत काय काम, अशी भावना अधिकाऱ्यांमध्ये बढावत चालली आहे. काही अधिकाऱ्यांनी तर दुसरीकडे बदलीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचीही माहिती आहे.

एसीबीच्या तज्ज्ञांकडे दुय्यम जबाबदारी
प्रकाश जाधव हे एसीबीचे प्रमुख असताना विभागाची कामगिरी सुधारण्यासाठी लाचलुचपत प्रकरणांत तज्ज्ञ अशी ख्याती मिळवलेल्या अधिकाऱ्यांना एकत्र आणले होते. आता त्याच अधिकाऱ्यांकडे कोर्ट-कचेरीचे काम सांभाळणे, अशी दुय्यम स्वरूपाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

नागपूर विभागात सहा जिल्हे असून ते सर्व जिल्हे नागपूर एसीबी अधीक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत आहेत. त्यामुळे कोणतेही अधिकारी, कोणत्याही प्रकरणांचा तपास करू शकतात. हा कार्यालयाचा अंतर्गत मुद्दा असून त्यासंदर्भात प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
– राजीव जैन, अधीक्षक, एसीबी नागपूर

Story img Loader