गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रयोग केले जात आहेत. अशात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात एक, दोन नव्हे तर तब्बल सहा विविध भाषांचा वापर प्रचारासाठी होतो आहे. गडचिरोली जिल्ह्याला तीन राज्यांची सीमा लागून असल्याने या भागात गोंडी, माडिया, तेलगू, बंगाली, मराठी आणि हिंदी असे बहुभाषिक नागरिक येथे राहतात. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी गाणी, लोकगीते आणि घोषणा सहा भाषांमध्ये बनवून घेतले आहे. त्यामुळे सहा भाषांमध्ये प्रचार सुरु असलेले अहेरी राज्यातील एकमेव विधानसभा बनले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना अहेरी मतदार संघात भौगोलिक परिस्थितीमुळे उमेदवारांना दररोज तीनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे. दुसरीकडे या मतदारसंघात बहूभाषिक मतदार असल्यामुळे पाच ते सहा भाषांमध्ये मतदारांशी संवाद साधावा लागत आहे. या मतदार संघावर असलेला तेलगू भाषेचा प्रभाव पाहता प्रचारासाठी तेलंगणाच्या निवडणुकीत वापरण्यात येणारी लोकगीते सगळ्याच उमेदवारांनी तेलुगु भाषेत तयार करून मागवून त्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. पथनाट्य ही मतदारांना आकर्षित करत आहेत.

हेही वाचा…‘अकोला पश्चिम’मध्ये भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक वॉर; नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

अहेरी हे भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वात मोठे विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा आणि अहेरी या पाच तालुक्याचा समवेश आहे. भामरागड तालुक्यातील लाहेरी पासून सिरोंचा तालुक्यातील पातागुडमपर्यंत अंतर अडीचशे ते तीनशे किलोमीटर इतके आहे.

त्यामुळे प्रचारादरम्यान उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम, भाजपचे बंडखोर अम्ब्रीशराव आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हणमंतू मडावी, माजी आमदार पेंटा रामा तलांडी यांची कन्या नीता तलांडी प्रहार पक्षाकडून उभे आहेत. धर्मरावबाबा, अम्ब्रीश आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, हणमंतू हे अहेरी आणि आलापल्लीत मुक्कामी आहेत. तर भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंच्यात दोन वर्षांपूर्वी घर बांधल्याने अहेरीत भाड्याचे घर घेऊन ये जा करत असतात.

हेही वाचा…VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी

अहेरी-आलापल्ली-सिरोंचा शंभर किलोमीटर अंतर असून शेवटचे टोक तालुका मुख्यालयापासून १७० किमी इतक्या अंतरावर आहे. विधानसभेतील भामरागड, एटापल्ली व अहेरी तालुक्यात तेलगू पाठोपाठ गोंडी आणि माडिया भाषा बोलली जाते. मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक बंगाली समाज असल्याने तेथे बंगाली भाषेचा प्रभाव आहे. तर सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक तेलगू भाषिक असल्याने तेथे तेलंगनाचा प्रभाव आहे. त्यामुळे उमेदवारांनी मराठी हिंदीसह या भाषांमध्ये देखील गाणी, लोकगीत मागवून घेतले आहे. त्यामुळे या मतदारसंघात रस्त्यापासून समाज माध्यमापर्यंत सर्वत्र सहा भाषेतील गाण्यांची धूम बघायला मिळत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In aheri constituency six different languages are used for campaigning in gadchiroli district ssp 89 sud 02