अकोला : जिल्ह्यात अपघाताच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गत तीन वर्षांत रस्ते अपघातात ४९६ जणांचा बळी गेला. त्यामध्ये हेल्मेट परिधान न केल्याने १२० दुचाकी चालकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये विविध कारणांवरून रस्ते अपघाताची संख्या झपाट्याने वाढली. पोलीस दप्तरी नोंद असलेल्या अपघातांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. अपघातांसाठी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेसह मानवी चुका देखील कारणीभूत ठरल्या आहेत.
अनेक वेळा अपघातात दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू ओढावल्याचे समोर आले. गेल्या तीन वर्षांतील गंभीर अपघाताची आकडेवारी लक्षात घेता सन २०२१ मध्ये १५१ अपघात होऊन १६७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी २३ दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले. सन २०२२ मध्ये १३१ गंभीर अपघात झाले असून १४१ जणांचा मृत्यू झाला.
हेही वाचा : भारत-जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्प, महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात ‘पायलट प्रोजेक्ट’
त्यामध्ये ४० दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर ३२ जण जखमी झाले होते. सन २०२३ मध्ये १७७ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले. त्यात १८८ जणांचा जीव गेला असून ५७ दुचाकीचालकांनी हेल्मेटचा वापर न केल्याने त्यांचा अपघातात बळी गेला. ८७ जण जखमी झाले. तीन वर्षांत एकूण ४५९ गंभीर रस्ते अपघात झाले आहेत. दुचाकी चालकांनी वाहन चालवतांना हेल्मेट परिधान केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे आगामी काळात पोलीस प्रशासनाद्वारे विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
हेही वाचा : कविवर्य राजा बढे यांच्या राज्यगीताची कोनशिला कचऱ्यात
…तर कारवाई होणार
अकोला पोलीस प्रशासनाकडून पुढील आठवड्यापासून विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवतांना आढळल्यास चालकाला ५०० रुपये दंड व परवाना निलंबन करण्याची कारवाई केली जाणार आहे. दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहनांचे कागदपत्रे सोबत बाळगावे, नियमांचे पालन करावे, प्रलंबित दंड त्वरित भरावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले आहे.