अकोला : शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली. या प्रकरणी एका १९ वर्षीय युवतीसह चार जणांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मोक्कातील एका कुख्यात गुंडाचा देखील समावेश असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुने शहर भागातील एका अल्पवयीन मुलीचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने तिच्या मैत्रिणीने पीडित मुलीला ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी बोलावून घेतले. वाढदिवस साजरा करतांना एका आरोपीने पीडितेला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला. ते पिल्यावर पीडित मुलीला गुंगी यायला लागली. एका आरोपीने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा मुलीने विरोध केला. त्यानंतरही पीडित मुलीवर जोरजबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. इतर दोन मित्रांनी देखील मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडल्याची तक्रार देण्यात आली आहे. घडलेला गंभीर प्रकार त्याच दिवशी पीडितीने आपल्या घरी सांगितल्यावर पालकांना मोठा धक्का बसला. प्रकरणात कुख्यात गुंडाचा सहभाग असल्याने कुटुंबात दहशत पसरली होती. त्यामुळे पीडित मुलगी व तिच्या आईने अकोला सोडून बाहेरगाव गाठले. १५ दिवसानंतर पीडिता व तिच्या आईने जुने शहर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोक्का दाखल असलेला बंटी सटवाले, लल्ला इंगळे, चिकू नामक युवक व १९ वर्षीय तरुणीविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो) अंतर्गत तसेच बीएनएस कलम ६४ (एच), ६५, ७०, ३५१ (१), (२), सह कलम ४ (२),५ (पी), (जी) ६, १२ नुसार गन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तिन्ही युवक फरार झाल्याची माहिती आहे. जुने शहर पोलिसांनी आरोपी १९ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. फरार आरोपींचा जुने शहर पोलीस कसून शोध घेत आहेत.

हेही वाचा : नागपूर : ती ‘फाईल’ बंद! नागपूर विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयाने…

यापूर्वीही अत्याचाराच्या घटना

अकोला शहरांमध्ये या अगोदर देखील शितपेयातून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola 19 year old girl gang raped after given drugs ppd 88 css