अकोला : पर्यावरणपूरक संदेश घेऊन अकोल्यातील पाच सायकलस्वार एक हजार किमीच्या पर्यावरण संवर्धन व प्रचार-प्रसार सायकल यात्रेला निघाले आहेत. अकोला ते पंढरपूर आणि परत अकोला अशा सायकलयात्रेला सुरुवात केली आहे. या सायकलयात्रेतून जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण जगच प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. सद्यस्थितीत पर्यावरणाचा होणारा ऱ्हास बघता सायकल चालविणे मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ही वसुंधरा कार्बनमुक्त करण्यासाठी प्रत्येकाचा खारीचा वाटा असायलाच हवा, हा संदेश देण्यासाठी अकोल्यातील सायकलस्वार मिलिंद लांडे, गौतम कांबळे, कृष्णा शर्मा, संतोष कलेवार व श्रीकांत वानखडे हे पाच जण सायकल यात्रेवर निघाले आहेत.
हेही वाचा : “शरद पवार यांनी मराठा की ओबीसी आहे ते जाहीर करावे”, खासदार प्रतापराव जाधव यांचे आवाहन
मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन व सायक्लोन अकोला या दोन्ही संस्थांनी या यात्रेला पाठबळ दिले आहे. या यात्रेला डॉ. गजानन नारे व मास्टर्सचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत तराळ यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी डॉ. महेंद्र काळे ,डॉ. राजेंद्र सोनोने, डॉ. रहमान खान, डॉ. प्रज्ञोत गर्गे, डाॅ. के.के.अग्रवाल, स्केटिंग असोसिएशनचे सचिन अमीन, मास्टर्स ऍथलेटिक्स व अकोला सायक्लोनचे पदाधिकारी उपस्थित होते. या यात्रेदरम्यान वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये पर्यावरण वाचविण्यासाठी काय केले पाहिजे, याचा प्रचार-प्रसार हे पाचही सायकलस्वार करणार आहेत. प्रास्ताविक अशोक ढेरे यांनी, तर सूत्रसंचालन ॲड. प्रकाश दाते यांनी केले.