अकोला : जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. अकोला-अकोट मार्गावरील चोहट्टा बाजारजवळ रस्त्याच्या बाजूचा भराव वाहून गेल्याने वाहतूक प्रभावित झाली. जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथे अतिवृष्टीने भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर ८३ घरांची पडझड झाली.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला होता. त्यामुळे वातावरणात उकाडा वाढला. बहुतांश पेरणी आटोपल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. दरम्यान, रविवारी सायंकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची रिपरिप मध्यरात्रीपर्यंत सुरुच होती. सोमवारी पहाटे पुन्हा पावसाने जोर पकडला. शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मोठी उमरी, जवाहर नगर, डाबकी रोड, कौलखेड, शिवणी, शिवर, गीता नगर, गंगा नगर, जुने शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सर्वत्र जलमय वातावरण झाले. काही भागात नागरिकांच्या घरामध्ये रस्ते, नाल्यातील पाणी शिरले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातही पाणी साचल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागला.
हेही वाचा : बुलढाणा : खामगावात अतिवृष्टीचे तांडव; आवार मध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पुराने वेढलेल्या नऊ व्यक्ती…
शहरातील मोर्णासह जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. काही नदी, नाल्यांना मोठा पूर आला. अकोट-अकोला मार्गावरील चोहोट्टा बाजार जवळच्या शहानूर नदी नजीकच्या मुख्य रस्त्याच्या बाजूचा भराव खचला. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली. आ. रणधीर सावरकर यांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. मोर्णा नदीच्या पुराचे पाणी उगवा येथील पुलावरून वाहत असल्याने आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भौरद व गायगावला जोडणारा शेगाव रस्त्यावरील पुलावरील पाणी असल्यामुळे मार्ग बंद आहे. उरळ व झुरळ मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली. अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील मनोहर महादेव वानखडे (६०) यांच्या घराची भिंत कोसळून मृत्यू झाला. तसेच दोन कच्च्या घरांचे नुकसान झाले. बाळापूर तालुक्यातील ८१ घरांचे अंशत: नुकसान झाले.
अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ५४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात सर्वाधिक ९०.८ मि.मी. पाऊस पडला, तर अकोला तालुक्यात ९० मि.मी. पावसाची नोंद झाली. अकोटमध्ये ३४.२, तेल्हारा ४६.६, पातूर ३५.७, बार्शिटाकळी ५७, तर मूर्तिजापूर तालुक्यात १८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यामध्ये अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार १०६, बाळापुर तालुक्यातील बाळापूर ११६.८, पारस १११.५, व्याळा ६६.८, वाडेगाव ६६.८, उरळ १००.८, हातरुण ७९, अकोला तालुक्यातील अकोला ११०, दहीहांडा ८५.८, कापशी १००.३, उगवा ६९.५, आगर ६९.८, शिवणी १६३, कौलखेड १४६ व बार्शिटाकळी तालुक्यातील राजंदा येथे ११६.५ मि.मी. पाऊस पडला आहे.
हेही वाचा : ‘लाडकी बहीण’ अडचणीत, सेतू केंद्र चालकांचा असहकार…काय आहेत कारणे?
पुरात अडकलेल्यांना बाहेर काढले
अकोला तालुक्यातील खरप येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी चालक व मजूरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे जेसीबीचे चालक राम पटेल, विक्रम सिंग, तसेच मजूर संजय बागूल, सोमन दिवे, विजय पवार, करण कसबेकर, मुन्ना चितकार, जयसिंग चतुर, गोलु धायकर हे आज सकाळपासून अडकले होते. त्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.