अकोला : समाजमन सुन्न करणारी एक घटना अकोला शहरातून समोर आली आहे. आई-वडील नातेवाईकाकडे लग्नाला गेले असताना आठव्या वर्गातील एका विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी नोंद घेतली असून पंचनाम्यामध्ये पोलिसांना त्या मुलीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्याच्या आधारावर पोलीस तपास केला जात आहे.
आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. शहराच्या मलकापूर परिसरातील रहिवासी विद्यार्थिनीचे आई-वडील लग्नानिमित्त नातेवाइकाकडे गेले होते. त्यावेळी घरी त्यांची इयत्ता आठवीत शिक्षण घेणारी मुलगी एकटीच होती. मुलीच्या वडिलांनी दुपारी तिच्यासोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होत नव्हता. मुलीकडून प्रतिसाद न मिळाल्याने आई-वडील अस्वस्थ झाले. वडिलांनी शेजारी राहणाऱ्याला घरी पाठवून पाहणी करण्याची विनंती केली.
शेजारच्यांनी त्यांचे घर गाठताच समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शेजारच्यांनी त्या मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोटच्या मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच आई-वडिलांनी तात्काळ घरी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अभ्यासात हुशार असलेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जीवनातील ताण-तणावात वाढ
जीवनात ताण-तणाव वाढत आहे. कौटुंबिक पातळीवर विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. यातून जीवनात नैराश्य पसरते. नैराश्य व तणाव यावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. स्पर्धा, अभ्यास, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंता यातून तणाव वाढत जातो. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरर्थक व नीरस वाटते, तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक पाठबळ मिळाले नाही तर तो स्वतःला संपवायचा प्रयत्न करतो. आठवीत शिकणाऱ्या मुलीने इतके टोकाचे पाऊल उचलण्यामागे नेमकं कारण काय? हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहणार आहे.