अकोला : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवं. संतोष देशमुख आणि परभणीतील स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासह या घटनांचा निषेध करण्यासाठी वाशीम येथे सर्वपक्षीय, सर्व जातीतील समाज बांधवानी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी दिवं. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ फाशी द्या, सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यात याव्या, अशा मागणीचे फलक हाती घेत न्यायाची मागणी लावून धरण्यात आली.
दिवं. संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिन्यापासून चर्चेत आहे. ९ डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र रोषाची भावना आहे. दिवं. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीना फाशी द्यावी, स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यात यावा, यासाठी आज विदर्भातील पहिला मूकमोर्चा वाशीम शहरात काढण्यात आला. यावेळी दिवं. संतोष देशमुख यांचा भाऊ उपस्थित होता. माझ्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई व्हावी, दोषींना फाशी द्यावी, अशी मागणी केली. या प्रकरणाची जबाबदारी उज्ज्वल निकम यांना द्यावी, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
हेही वाचा : शासकीय नोकरी घोटाळा : बुलढाण्यात बनावट मंत्रालयीन शिक्के, नियुक्तीपत्रे अन् बरेच काही…
हा मूक मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पाटणी चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, देशमुख रुग्णालय, अकोला नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. दिवं. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलने केल्या जातील, असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला. या मूक मोर्चात युवती, महिला, सर्व धर्मीय, समाजातील नागरिक, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा : पाण्यामुळे नव्हे, ‘फंगस’मुळे केस गळती… आता खुद्द मंत्रीच म्हणाले, बिनधास्त आंघोळ…
‘पुरावे नष्ट केले, तर सरकार जबाबदार’
या प्रकरणामध्ये अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी सापडलेला नाही. या प्रकरणातील पुरावे त्याने जर नष्ट केले तर याची सर्वस्वी जबाबदारी यंत्रणा आणि राज्य सरकारची राहील. तपासाची माहिती आम्हाला दिली जात नाही, आज सायंकाळपर्यंत माहिती मिळाली पाहिजे, असेही धनंजय देशमुख यावेळी म्हणाले.