अकोला : बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. जन्म प्रमाणपत्राची पडताळणीमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे ते वितरीत केल्याचे समोर आले. या प्रकरणात आतापर्यंत जिल्ह्यातील विविध सात पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ५२ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात १६ आरोपींना गजाआड केले, अशी माहिती १९ मार्चला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी किरीट सोमय्या यांना पत्राद्वारे दिली.

राज्यात बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. अकोला जिल्ह्यात तब्बल १५ हजार ८४५ जन्म प्रमाणपत्र उशिराने देण्यात आले आहेत. जिल्ह्यात विविध भागांत वास्तव्यास असलेल्या अनेकांनी गैरमार्गाने जन्म दाखले मिळवले. या प्रकरणात महसूल विभागाकडून संबंधित प्रमाणपत्रधारकांची पडताळणी केली. शाळांच्या दाखल्यांची देखील तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये विविध गंभीर प्रकार आढळून आले आहेत. कागदपत्रांमध्ये खोडतोड व फेरफार केले. ते प्रशासनाला सादर करीत जन्म प्रमाणपत्र प्राप्त केल्याच्या अनेक घटना जिल्ह्यातील विविध तालुक्यात समोर आल्या आहेत. या प्रकरणात संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी दाखल केल्या.

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम १३ (३) नुसार जन्म व मृत्यू प्रमाणपत्र निर्गमित करतांना चुकीची कागदपत्रे सादर केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये अकोला शहरांमध्ये एका गुन्ह्यात सर्वाधिक २३ आरोपी निष्पन्न झाले आहेत. मूर्तिजापूर तालुक्यात दोन गुन्ह्यात दोन, बार्शीटाकळी तालुक्यात तीन गुन्ह्यात १२, पातूर तालुक्यात एका गुन्ह्यात पाच, अकोट एका गुन्ह्यात नऊ व तेल्हारा तालुक्यात एका गुन्ह्यात एक असे एकूण नऊ गुन्हे ५२ आरोपींवर दाखल झाले आहेत.

गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी निष्पन्न केलेल्या एकूण आरोपींची संख्या २४ असून तहसीलदारांच्या अहवालानुसार एकूण आरोपी ११ आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण १६ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तपासात सूचनापत्र दिलेल्या आरोपींची संख्या ४१ आहे. बनावट कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू असून प्रचलित कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी किरीट सोमय्या यांना पत्राद्वारे कळवले.

Story img Loader