अकोला : भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम विदर्भस्तरीय कार्यशाळेतून पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या संघटनात्मक वाढीचा कानमंत्र देण्यात आला. भाजपचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने कार्यरत रहावे, असे आवाहन महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

भाजपची पश्चिम विदर्भस्तरीय सक्रिय सदस्यता संघटन कार्यशाळेचे आयोजन गुरुवारी अकोल्यात करण्यात आले होते. या कार्यशाळेत उद्घाटक म्हणून चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कामगार मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर, पक्षाचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर, आ.डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, आ. वसंत खंडेलवाल, माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप तयारीला लागला आहे. पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचे वरिष्ठ नेतृत्वाचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान जोमाने राबविण्यात येत आहे. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी अभियानाचे लक्ष्य देण्यात आले. पश्चिम विदर्भस्तरीय कार्यशाळेत पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानावर ऊहापोह करण्यात आला.

पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करावे, बूथ स्तरापासून पक्ष वाढीसाठी सुक्ष्म नियोजन करून कार्यरत राहण्याचा महत्वपूर्ण संदेश कार्यशाळेतून देण्यात आला आहे. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी कार्यशाळेत सहभागी पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अमरावती विभागातील पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा सखोल आढावा पक्षाच्या नेत्यांकडून घेण्यात आला. भविष्यातील विस्तार योजनांवर देखील यावेळी मंथन करण्यात आले. भाजपचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावी कार्य करणे अपेक्षित असल्याच्या सूचना कार्यशाळेतून पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या कार्यशाळेमध्ये अकोला शहर व ग्रामीण, बुलढाणा, अमरावती शहर व ग्रामीण, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातील सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व मंडळाचे अध्यक्ष, महामंत्री, महिला, युवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक, किसान आघाडीसह विविध आघाड्यांचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आदी सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता पक्षनेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली.

Story img Loader