अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले रवी राठी यांनी दोन दिवसांत पक्ष सोडला. आता ते प्रहार जनशक्ती पक्षाकडून मूर्तिजापूरच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोन दिवसांत पक्षांतर करणाऱ्या रवी राठी यांनी भाजपने घात केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील भाजपच्या प्रथम क्रमांकाच्या नेत्याने दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका देखील त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवार जाहीर करताच पक्षात फूट पडली. उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्यावरून गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढणारे उमेदवार रवी राठी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला. त्यानंतर रवी राठी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला. मूर्तिजापूरमध्ये २०१९ मध्ये रवी राठी यांना तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार १५५ मते मिळाली होती. भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर त्यांनी पक्षप्रवेश केला होता. मात्र, भाजपने विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनाच सलग चौथ्यांदा संधी दिली. हरीश पिंपळे यांना उमेदवारी जाहीर होताच रवी राठी यांनी भाजप पक्ष देखील सोडला. त्यांचा भाजपमधील प्रवेश औट घटकेचा ठरला. मूर्तिजापुरातून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी रवी राठी प्रहारमध्ये दाखल झाले. त्या पक्षाकडून त्यांनी मूर्तिजापूरमधून उमेदवारी दाखल केली.

हेही वाचा: अनिस अहमद यांची वेळ चुकली की चुकवल्या गेली…

दरम्यान, रवी राठी यांनी भाजपसह राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. गेल्या १० वर्षांपासून सामाजिकसह पक्षाचे कार्य करीत होतो. राष्ट्रवादीचे मतदान सात हजारावरून ४२ हजारावर आणले. आता पाच वर्षांनंतर जिंकण्याची स्थिती होती. मात्र, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी पैशांवर किंवा इतर कशावर विश्वास ठेवला, याची कल्पना नाही. दोन-तीन महिन्यापूर्वी पक्षात येतात आणि त्यांना उमेदवारी मिळते. मविआतील सर्व पदाधिकारी नाराज आहेत, अशी टीका राठी यांनी केली.

हेही वाचा: पटोलेंनी तिकीट विकले, काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराच्या आरोपाने खळबळ

भाजप पक्षाकडून बोलावणे आले, उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याने पक्षप्रवेश केला. राज्यातील भाजपच्या पहिल्या क्रमांकाच्या नेत्यासोबत चर्चा झाली. त्यांनी खात्री दिल्याने भाजपमध्ये गेलो. मात्र, भाजपने सुद्धा माझा घात केला, असा आरोप रवी राठी यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola bjp leader ravi rathi who joined prahar janshakti criticizes bjp ppd 88 css