अकोला : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणी अकोल्यात भाजपने गुरुवारी सकाळी तीव्र निषेध आंदोलन केले. संवैधानिक पदावर असलेल्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा म्हणजे संपूर्ण देशाचा अवमान आहे. संसदेला स्मशानभूमी संबोधण्याचा बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार असून खा. राहुल गांधी, खा. कल्याण बॅनर्जी, खा. संजय राऊत यांना तसे वाटत असल्यास ते संसदेचे प्रतिनिधित्व कशाला करतात? असा खडा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : दहा दिवसांच्या अधिवेशनात काय-काय झाले? हा आहे लेखाजोखा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अवमान प्रकरणावरून सत्ताधारी भाजपने विरोधकांना घेरले आहे. या प्रकरणी अकोला भाजपच्यावतीने गुरुवारी सकाळी जयप्रकाश नारायण चौकात तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षातील खासदारांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संवैधानिक पदाचा अवमान केल्याने खा. राहुल गांधीसह इतर खासदारांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आ.रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे, किशोर मागंटे पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.