अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी परिवारवादावर टीका करून गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे नारायणराव गव्हाणकर म्हणाले. अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे प्रकृती अस्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे अकोल्यातून भाजपकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छूक होते. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बाळापूरचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांचा देखील समावेश होता. इच्छुकांनी तिकिट मिळवण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले. भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पूत्र अनुप धोत्रे यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. त्यामुळे इतर इच्छुकांची नाराजी झाली. नारायणराव गव्हाणकर यांनी भावनांना वाट मोकळी करून परिवारवादावरून भाजपवर टीका केली आहे. गव्हाणकर यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन आज अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “पाच गद्दारांना धडा मिळाला, इतरांना जनता धडा शिकविणार”, सुषमा अंधारे यांची टीका; म्हणाल्या…

१९७७ पासून पक्षामध्ये कार्य करीत आहे. लोकसभेची उमेदवारी देतांना माझ्यावर अन्याय झाला. अतिशय नवख्या उमेदवाराला फक्त खासदारांचे सुपूत्र असल्याचे उमेदवारी दिली. ग्रामपंचायतची निवडणूक देखील लढली नाही, अशांना भाजपने तिकीट दिले, असा आरोप गव्हाणकर यांनी केला. नरेंद्र मोदी परिवारवाद तोडायचा असल्याचे सांगतात. अकोल्यात मात्र परिवारवाद व घराणेशाही जोपासली जात आहे, अशी टीका त्यांनी केली. आगामी चार दिवसांत सर्व हितचिंतकांची चर्चा करून निर्णय घेईल. कुठल्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे गव्हाणकर यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola bjp senior leader narayanrao gavhankar filed nomination for akola lok sabha rebellion in bjp ppd 88 css