अकोला : बैल चोरीच्या संशयावरून दोन वेगवेगळ्या धर्मियांच्या गटांमध्ये हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवर दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. बोरगावमंजू गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरगाव मंजू गावातील धनगरपूरा वस्तीमध्ये सोमवारी रात्री दोन जण बैल घेऊन जात असतांना त्यांना त्याठिकाणी उपस्थितीत इतर दोन जणांनी बैल चोरीचे आहेत काय? अशी विचारणा केली. त्यावरून किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. यावेळी दोन्ही बाजुचे प्रत्येकी १५ जणांनी एकमेकांवर लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी हाणामारी सुरू केली. यावेळी दगडफेकही करण्यात आली. त्यामध्ये दोन्ही बाजुचे लोक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा : Pune Porsche Accident : आरोपीचे रक्त नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांना नोटीस; महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून कारवाईचे संकेत

जखमींना तत्काळ उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकांत उर्फ अनिकेत राजेंद्र गवळी रा. बोरगाव मंजू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद अयफास मो. अफसर, शेख जुबेर शेख मुन्शी, शेख सददाम उर्फ सज्जू शेख गणी, शेख इमरान मुस्तफा कुरेशी व इतर १० ते १२ जणांवर, तर शेख जुबेर शेख मुन्शी रा.बोरगाव मंजू यांच्या फिर्यादीवरून आरोपी अनिकेत राजेंद्र गवळी, योगेश भाऊराव मोरे, केशव साहेबराव मोरे, साहेबराव नारायण मोरे व इतर १० ते १२ जणांवर परस्पर विरोधी भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४८, १४९ सहकलम १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : संतापजनक : नवजात बाळाला नालीत फेकले; पुसदमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना…

दोन्ही बाजूच्या प्रमुख आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्ह्यातील इतर आरोपींना निष्पन्न करून त्यांची धरपकड केली जात आहे. घटनास्थळावर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी शांतता राखावी, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे. बोरगाव मंजू येथील परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola bullock theft suspicion clash between two groups in borgaon manju ppd 88 css
Show comments