अकोला : मकर संक्रांतीला पतंगबाजीतून अनेक जण आनंद घेतात. मात्र, प्रतिबंधित घातक नायलॉन चायना मांजामुळे सर्वसामान्यांच्या जीवाला घोर लागला आहे. नायलॉन मांजाला रोखण्यात अपयश आले असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास त्याची विक्री व वापर सुरूच आहे. या मांजामुळे शहरात एका महिलेचा काल पाय कापल्या गेल्यानंतर आज एका व्यावसायिकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.

पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होतो. हा नायलॉन मांजा प्रतिबंधित असतानाही त्याची सर्रासपणे विक्री सुरूच आहे. प्रशासनाकडून केवळ कारवाईचा देखावा होत असल्याचा आरोप होत आहे. या नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठल्याचे विविध घटनांवरून अधोरेखित होते.

हेही वाचा : नागपूर : बुटीबोरी पूलप्रकरणी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह, साडेतीन वर्षांत पुलास तडे

अकोल्यातील जुने शहर भागातील गुरुदेव नगर येथे नायलॉन मांजामुळे एका महिलेचा पाय कापल्या गेल्याची दुर्दैवी घटना काल घडली. कलावती मराठे यांच्या पायात नायलॉन मांजा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांच्या पायाला चक्क ४५ टाके पडले आहेत. नायलॉन मांजाच्या वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री व वापर होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग नायलॉन मांजा विरोधात कारवाईची मोहीम राबवत असतानाही सर्वसामान्यांच्या हातात नायलॉन मांजा पोहोचतोय. प्रशासनाकडून नायलॉन मांजावर कारवाईचा केवळ फार्स ठरल्याचे बोलल्या जात आहे.

आज मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा जोर चांगलाच वाढला होता. शहरातील खोलेश्वर भागात व्यावसायिक गणेश श्रीवास्तव आपले दुकान बंद करून घरी जात असताना वाटेत त्यांच्या डोळ्याला नायलॉन मांजामुळे गंभीर इजा झाली. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

हेही वाचा : नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…

महापालिकेकडून रीलची तपासणी

नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पक्ष्यांना होणारी इजा व अपघात टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रात स्वच्छता निरीक्षकांमार्फत पतंग, मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्यात आली. काही भागात नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवतांना युवक आढळून आले. त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. गेल्या महिन्याभरात महापालिकेने २०० पेक्षा अधिक कारवाया करून नायलॉन मांजा जप्त केला. तरी देखील शहरात सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर सुरू असून त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत.

Story img Loader