अकोला : शहरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत शनिवारी तीन ठिकाणी धाड टाकून झाडाझडती घेण्यात आली. वेगवेगळ्या पथकांनी कारवाई करून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. धाडीमध्ये प्राप्त कागदपत्रांची छाननी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील अकोट फैल, गड्डम प्लॉट व मलकापुरातील अंबिका नगर या तीन ठिकाणी तीन पथकाद्वारे मोहीम राबविण्यात आली. या धाडीमध्ये आक्षेपार्ह दोन खरेदीखत, पाच करारनामा, नऊ कोरे मुद्रांक, ३४ कोरे धनादेश, एक बँक पासबुक, १० नोंदी डायरी, एक सातबारा, एक फेरफार, एक एटीएम कार्ड, २० कच्च्या चिठ्ठया आदी जप्त करण्यात आले आहेत. कारवाई दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त होता. सहकार विभागाचे अधिकारी पथक प्रमुख रोहिणी विटनकर, योगेश लोटे, दीपक शिरसाट, फिरते पथक प्रमुख ज्योती मलिये, सहाय्यक अनिल मनवर, गणेश भारस्कर, जे. एस. सहारे, एस. ए. गावंडे, आर. पी. भोयर, आर. आर. घोडके, डी. डी. गोपनारायण, विनोद खंडारे, आर. एम. बोंद्रे, एस. एम. वानखडे, एस. डी. नरवाडे, एम. आर. सोनुलकर, आनंद शिरसाट, सविता राऊत या १८ कर्मचाऱ्यांचा तीन पथकात समावेश होता.

हेही वाचा : काय हे….? मुलीचे लग्न तोंडावर असताना वृद्ध दाम्पत्याचा घटस्फोट…

धाडीमधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सावकारीचा अधिकृत परवाना नसलेल्या व्यक्तीकडून व्याजाने पैसे दिले जात असल्यास आवश्यक पुराव्यासह सहकारी संस्थेच्या कार्यालयात तक्रार दाखल करावी, तसेच ज्या नागरिकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी नोंदणीकृत पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा परवानाधारक सावकार यांचेकडून रितसर कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

हेही वाचा : पुन्हा एक वाघ कायमचा पिंजऱ्याआड….

आतापर्यंत ३३ अवैध सावकारांवर गुन्हे

सहकारी संस्थेच्या कार्यालयामार्फत आतापर्यंत अवैध सावकारी अंतर्गत बळकावलेली एकूण १५०.३३ हे. आर शेतजमीन व ४९३९.५० चौ. फूट जागा तसेच एक राहता फ्लॅट संबंधितांना परत करण्यात आला आहे. आजपर्यंत १९७ प्रकरणात कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३३ अवैध सावकारांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून २१ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola campaign against illegal moneylenders css