अकोला : पश्चिम विदर्भातील रस्त्यांची बहुतांश कामे पूर्ण होत आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे उद्योग-व्यापार वाढेल, नवीन गुंतवणूक येईल. तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. शेतकऱ्यांना लाभ होईल. यातून विदर्भ सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल, असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणाचे लोकार्पण व मूर्तिजापूर-कारंजा चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार भावना गवळी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे आदींसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा : “…तर मी पंकजा मुंडेंना मुख्‍यमंत्री करेल”, महादेव जानकर यांची घोषणा

पुढे ते म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ च्या चौपदरीकरणाच्या कामात अनेक अडचणी आल्यात. एल ॲन्ड टी कंपनीने याचे काम घेतले होते. मात्र, त्यांनी माघार घेतली. त्यानंतर आयएल ॲन्ड एफएस कंपनीला याचे काम दिले होते. त्या कंपनीचे दिवाळे निघाले. यामुळे कामाला दिरंगाई होऊन नागरिकांना खूप त्रास झाला. या रस्त्यासाठी खासदार संजय धोत्रे आणि स्व.आमदार गोवर्धन शर्मा यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज हा रस्ता पूर्णत्वास जात असल्याने त्याचा आनंद आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या निर्माण कार्यात विशेषत: सिंचनाची कामे करण्यात आली. कृषी विद्यापीठात ३६ तलावांची निर्मिती केली. बोरगाव मंजू येथे दोन तलाव बांधण्यात आले. अनेक ठिकाणी नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. रस्ते कामातून सिंचनाची मोठी व्यवस्था निर्माण झाली, असे गडकरी म्हणाले.

हेही वाचा : एकल बेलदार समाजाचे २४ नोव्हेंबरपासून नागपुरात उपोषण; मागण्या काय? जाणून घ्या….

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सिंचन आणखी क्षमता वाढविण्याची गरज आहे. दुग्धव्यवसाय व मत्स्यशेती उभी केली पाहिजे. त्याच बरोबर कापूस व सोयाबीनचे एकरी उत्पन्न वाढविण्याची आश्यकता आहे. विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे उत्पन्न एकरी १५ क्विंटल, तर कापसाचे उत्पन्न २० क्विंटलच्या वर आले पाहिजे. या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जबाबदारी घ्यावी. अपेक्षित उत्पन्न घेणारे शेतकरी विदर्भात आहेत. त्यांना केवळ प्रोत्साहन द्यावे. खारपाणपट्ट्यामध्ये शेतात तलाव करून मत्स शेती करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि लोकप्रतिनिधींनी तज्ज्ञांमार्फत त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा देखील नितीन गडकरींनी व्यक्त केली.

तीन नवीन पुलांना मंजूरी

शेगाव ते देवरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर नवीन पूलासाठी १०० कोटी रुपये, बार्शीटाकळी रेल्वे उड्डाणपूलासाठी १३५ कोटी, अकोला-अकोट मार्गावर ग्रांधीग्राम येथे मोठ्या पुलासाठी ७० कोटी रुपये मंजूर करीत असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.

हेही वाचा : नागपूर : ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल सोमवारपासून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला-अकोट रस्त्याचे वाईट काम

अकोला-अकोट रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. कंत्राटदारांनी खराब काम केले, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली. या रस्त्यासाठी नवीन कंत्राटदार आणला आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे, तो उखडून नव्याने चांगला रस्ता तीन-चार महिन्यात पूर्ण करून दिला जाईल, असे गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola central minister nitin gadkari said that development of vidarbh possible only with good road infrastructure ppd 88 css