अकोला : प्रभू श्रीरामांप्रति काँग्रेस पक्षाचा आस्था असून भाजप श्रीराम मंदिराच्या नावावर राजकारण करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला. अयोध्या येथील श्रीराम मंदिराची पायाभरणी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वराज्य भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रभू श्रीरामांप्रति भाजप नेत्यांना कोणतीही आस्था नसून केवळ राजकारणासाठी त्यांचा वापर करीत आहेत. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा धार्मिक नियमानुसार झाली नाही. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा घेण्यात आला. यापूर्वी सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा हिंदू धर्माचे ध्वजवाहक शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली होती. कुठल्याही पद्धतीचे राजकारण न करता अतिशय दिमाखात हा सोहळा पूर्ण केला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजकीय हस्तक्षेप प्रकर्षाने टाळला होता. अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे राजकीयकरण करण्यात आले, अशी टीका डॉ. सुधीर ढोणे यांनी केली.

हेही वाचा : सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; अमरावती बाजार समितीत ४४९३ रुपये प्रतिक्विंटल भाव

हिंदू धर्मातील चारही पीठांच्या शंकराचाऱ्यांनी आक्षेप घेतले. मंदिर निर्माणाचा निर्णय भाजप सरकारने घेतलेला नसून त्यांचे कोणतेही योगदान नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळेच मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे भाजप सरकारने केवळ निवडणुकीसाठी मंदिर निर्माणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.

काँग्रेस पक्ष सर्व धर्माचा सन्मान करतो व धर्म ही खासगी बाब असून त्याचे राजकारण करू नये. शंकराचार्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेतेही अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेतील, अशी भूमिका डॉ. ढोणे यांनी मांडली. यावेळी महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, प्रदीप वखारिया, कपिल रावदेव, महेंद्र गवई, आकाश कवडे, भुषण ताले पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा : वर्धा : प्रभू रामाने दूर केले राजकीय वैर; केचे-काळे-वानखेडे आले एकत्र

काँग्रेस सरकारच्या काळातच मंदिराला जागा

१९८६ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कुलूप उघडून श्रीराम मंदिराचा शिलान्यास केला. १९९२ साली तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी सुमारे ६६ एकरची जागा प्रभू श्रीराम मंदिरासाठी संपादित केली. काँग्रेस सरकारने राम मंदिर वादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवून सर्वमान्य तोडगा काढण्याची भूमिका घेतली. ती मंदिर निर्माणात महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. खर्‍या अर्थाने श्रीराम मंदिर निर्मितीची पायाभरणी काँग्रेस सरकारच्या काळातच झाल्याचा दावा डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola congress leader dr sudhir dhone said bjp is doing politics of ayodhya s ram temple ppd 88 css