अकोला : देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. यादी कशी मंजूर केली, ते मला सांगतात. आमच्याकडचे किंवा त्यांच्याकडच्या पक्षातील कोण बदमाश आहेत, हे आम्ही एकमेकांना सांगत असतो. मैत्री आहेच, ती नाकारता येणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज येथे केले. मतविभाजन टाळण्यासाठी शेवटपर्यंत सोबत घेण्याचे प्रयत्न करूनही वंचितकडून सातत्याने अवमान केल्याचा आरोपही त्यांनी केला.

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले असता ते आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार चंद्रकांत हंडाेरे, महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांचे भाजपमधील नेत्यांशी छुपे संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याला पटोले यांनी आज अकोल्यातच प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात मित्रत्वाचे संबंध ठेवण्याची चांगली परंपरा आहे. त्यानुसार भाजपतील स्थानिक खासदार संजय धोत्रे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगली मैत्री आहे. आम्ही एकमेकांना गोष्टी सांगत असतो. मात्र, मैत्री आणि विचार वेगवेगळ्या जागी आहेत, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले. भाजपच्या खेळीतून महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले. महापुरुषांच्या विचाराला संपुष्टात आणून त्यांचा अवमान करण्याचे काम सातत्याने भाजपने केले. संविधान व्यवस्था संपवून टाकण्याचा डाव त्यांचा आहे. गुलामीकडे नेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात..”; अखेर राजश्री पाटील यांचाच उमदेवारी अर्ज दाखल

भाजप खासदार असताना नरेंद्र मोदींसमोर जनगणना, नोटबंदी, जीएसटी, आदींबाबतचे प्रश्न उपस्थित केले. भाजपचे सर्वसामान्यांच्या विरोधात धोरण असल्याने राजीनामा देऊन टाकला. ॲड. आंबेडकरांनी प्रत्येकवेळी माझ्या विरोधात उमेदवार दिला. २५ नोव्हेंबरला मुंबई येथील सभेत देखील अवमान केला. ‘मविआ’मध्ये वाटाघाटीमध्येदेखील तेच झाले. ॲड. आंबेडकर स्वत: कधीच मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले नाही. वंचितकडून मलाच नेहमी खालच्या पातळीवर लक्ष्य करण्यात आले, असा आरोप पटोलेंनी केला. मी भाजप सोडल्यापासून ते माझा राग करतात का माहीत नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. मी देखील वंचित असून माझ्यावर टीका का? असा प्रश्न त्यांनी केला.

हेही वाचा : राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात, ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा

कारागृहातून सुटून आलेला वंचितचा उमेदवार

शिरुर मतदारसंघात वंचितने जाहीर केलेला उमेदवार काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला आहे. त्याचे नाव देखील चुकीचे यादीत नमूद केले, अशी टीका पटोले यांनी केली. दोन दिवसांपूर्वीच ते फडणवीसांसोबत होते, यावरून समजून घ्या, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.

Story img Loader