अकोला : जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी तडाखा बसला आहे. तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. या अवकाळी पावसामुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५ घरांची पडझड झाली. ७४ गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीयसह जिल्ह्यातील वातावरण तप्त झाले. तापमानाचे नवनवे उच्चांक गाठत असतांना हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. विविध भागात मंगळवारी सायंकाळी विजांच्या जोरदार कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. यावेळी वादळी वारा देखील सुटल्याने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला.
हेही वाचा : माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांचा आरोप, म्हणाल्या, “विपश्यना केंद्राची १० एकर जागा…”
अवकाळी पावसामुळे जलमय वातावरण झाले असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले. काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. त्यानंतर बुधवारी दिवसभर उन्हाचा पारा चढल्यावर सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पुन्हा अवकाळी पाऊस पडला. सलग दोन दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, मका, ज्वारी, भाजीपाला, फळबागा, आंबा, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण चार हजार ०६० हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. ५१ घरांची अंशत: तर चार घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. ७४ गावांमध्ये नुकसान झाले आहे. अवकळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.
कांदा, गहू, फळबागांचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील पातूर तालुक्यात सर्वाधिक २४ गावातील दोन हजार ८६६ हेक्टरवर कांदा, गहू, मका, ज्वारी, फळपिकांचे नुकसान झाले. तेल्हारा तालुक्यात ११ गावातील ९२९ हेक्टर, बाळापूर तालुक्यातील १२ गावातील २५० हेक्टर, मूर्तिजापूर तालुक्यात चार गावातील १० हेक्टर व बार्शिटाकळी तालुक्यातील तीन गावातील पाच हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अकोल्यातील ३६, अकोट १६ व मूर्तिजापूर तालुक्यात तीन घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे.