अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो गायरान गावात कौटुंबिक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनेनंतर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.
दोन दिवसांपूर्वीच अकोला शहरातील खदान परिसरात दोन गटातील वादातून तरुणाची हत्या झाली होती. त्यानंतर आज मूर्तिजापूर तालुक्यात देखील तरुणाची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यात सिरसो गायरान नावाचे गाव आहे. या ठिकाणी पारधी समाजाची वस्ती आहे.
या ठिकाणी राहणाऱ्या दोन चुलत भावातील कुटुंबामध्ये घरगुती कारणावरून जुना वाद आहे. आज तो वाद पुन्हा एकदा उफाळून आला. दोन कुटुंबातील वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही बाजुने लाठ्या-काठ्या, कुऱ्हाड, दगड, गोट्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या तुंबळ हाणामारीमध्ये डोक्यावर कुऱ्हाडीचे वार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सुरज चंदू भोसले (१९) याचा मृत्यू झाला.
चंदू भोसले, रितेश भोसले याच्यासह दोन्ही बाजूचे चार ते पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारार्थ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यातील प्रकृती गंभीर असलेल्या काही जणांना अकोल्यातील सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील पोलिसांनी जप्त केले.
गावाला पोलीस छावणीचे स्वरूप
गावातील तणावाचे वातावरण लक्षात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात पोलीस छावणीचे स्वरूप आले. या प्रकरणी दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत दोन गटात हाणामारी होऊन एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आज दोन कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.