अकोला : मूर्तिजापूर येथील एका शाळेच्या इमारतीवरून साहित्यिकाचे कुटुंब व सत्ताधाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस विचारसरणीचे कुटुंब असल्याने सत्ताधारी प्रशासनावर दबाव टाकून शाळेच्या इमारतीवर कारवाईस भाग पाडत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीकांत तिडके यांचे पूत्र सार्थ तिडके यांनी केला. त्यावर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी ती इमारत नियमानुसार असल्याची कागदपत्रे संबंधितांनी दिल्यास आपण स्वतः त्यावरील कारवाई रोखू, असे प्रत्युत्तर दिले. या प्रकरणी विनापरवानगी इमारत उभारण्यात आल्याचे नगरपालिकेने स्पष्ट केले. या मुद्द्याला राजकीय रंग दिला जात असल्याची चर्चा आहे.
मूर्तिजापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. एक इमारत कॉम्प्लेक्स, तर दुसऱ्या इमारतीमध्ये परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या संस्थेद्वारे शाळा चालवली जाते. प्रस्तावित डीपी रस्त्यावर त्या इमारतीचा भाग येत असून इमारत उभारताना परवानगी घेतली नसल्याचे मूर्तिजापूर नगरपालिकेचे म्हणणे आहे. या प्रकरणी नगरपालिकेने डॉ. श्रीकांत तिडके यांच्या नावाने नोटीस बजावली. मात्र, ती जमीन व इमारत डॉ. तिडके यांच्या पत्नीच्या नावाने आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने नगरपालिकेने नोटीस बजावली, असे तिडके कुटुंबीय म्हणाले.
दरम्यान, मूर्तिजापूर नगरपालिकेचे एक पथक बुलडोजरसह कारवाई करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. तिडके कुटुंबाने या कारवाईला विरोध केला. जमीन एन.ए. करून सर्व परवानगी घेऊनच नियमानुसार इमारत उभी केली आहे. आमचे कुटुंब काँग्रेस विचारसरणीचे आहे. निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केल्याने सत्ताधारी सूडबुद्धीने प्रशासनावर दबाव टाकून शाळेच्या इमारतीवर कारवाईस भाग पाडत असल्याचा आरोप सार्थ तिडके यांनी केला. या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रस्तावित डीपी मार्गावरील ती इमारत नियमानुसार असल्याची कागदपत्रे सादर करावे. ते योग्य असल्यास कोणीही कारवाई करू शकत नाही. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई थांबवू. मात्र, इमारतच अवैध असल्यास प्रशासनाला नियमानुसार कारवाई करावीच लागेल, असे आ. हरीश पिंपळे म्हणाले.
प्रस्तावित डीपी मार्गावरील त्या इमारतीसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अवैध इमारती संदर्भात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. मालकाच्या नावाचा संबंध येत नाही. त्या इमारतीसाठी नोटीस बजावली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा देण्यात आली आहे, असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी सांगितले.