अकोला : जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणासाठी शेतकरी आक्रमक झाल्यानंतर बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे दुप्पट दराने विक्री होत असल्याच्या माहितीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी अश्विनी कृषी एजन्सीचे संचालक रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची लगबग दिसून येते. यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे. कापसाचे बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासून कृषी केंद्रावर रांगा लावून बियाणे खरेदी करीत आहे. मात्र, पुरेसे बियाणे उपलब्ध होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी रास्ता रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांना जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे अकोल्यात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. टिळक मार्गावर रास्ता रोको करीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा : अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा दुसरा भाग कधी भरायचा, महाविद्यालयाचा पसंतीक्रम कसा देता येणार..
त्यातच आता कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाले. विशिष्ट वाणाच्या बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने बनावट ग्राहक पाठवून बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकला. बियाण्याचे प्रति पाकिट ८६४ रुपये मूळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी तेल्हारा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील मे. अश्विनी ॲग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा : .. ‘तर’ गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद… केंद्र सरकारचा निर्णय
विशिष्ट बियाण्याचा तुटवडा
यंदा हंगामाची सुरुवात होण्याच्या अगोदरपासूनच कपाशीच्या विशिष्ट बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना जादा उत्पादन देणारे तसेच विशिष्ट बियाण्यालाच अधिक पसंती आहे. ते खरेदीसाठी जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच रांगा दिसून येतात. शेतकऱ्यांना केवळ दोनच पाकिट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अखेर आंदोलन केले. काळ्या बाजारात दुप्पट दराने त्या बियाण्याची विक्री होत आहे.