अकोला : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४ हजारावर हेक्टर पिकांना फटका बसला आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज यंत्रणांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील दहिगाव, रामगाव, म्हैसांग या भागात भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आदी यावेळी उपस्थित होते. रामगाव येथे पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे, दहिगाव, म्हैसांग या भागातील शिवाराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
वेचणी न झालेला कापूस ओला होणे, कापसाबरोबरच हरभरा, तूर पिकाचे या भागात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यंत्रणेने नुकसानग्रस्त क्षेत्राची संपूर्ण पाहणी करून व शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन परिपूर्ण नोंदी घ्याव्यात. पंचनाम्याची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
हेही वाचा : मंत्र्यांच्या साक्षीवर शिंदे गटाची मदार, अधिवेशन काळातही सुनावणी
दरम्यान, शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापपर्यंत माहितीनुसार तेल्हारा तालुक्यात ३२ हे., अकोला तालुक्यात सात हजार ९५१ हे., पातूर तालुक्यात दोन हजार ४८२ हे., बार्शिटाकळी तालुक्यात तीन हजार ५४९ हे. असे एकूण १४ हजार १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.