अकोला : पश्चिम विदर्भातून उद्धव ठाकरेंना आणखी मोठे धक्के देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या नाराज नेत्यांसोबत खासदार शिंदेंनी रविवारी रात्री उशीरा छत्रपती संभाजी नगरमध्ये एक बैठक घेतली. यामध्ये ठाकरे गटातील नाराज नेत्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर प्राथमिक बोलणी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून नाराज नेत्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षसंघटन बळकट करण्यासाठी बेरजेचे राजकारण केले जात आहे. अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहे. त्यामध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह जुन्या शिवसैनिकांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजांवर शिंदे गटाचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अकोला जिल्ह्याच्या ठाकरे गटातील नाराज नेत्यांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी रात्री उशीरा एक बैठक घेतली. शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर श्रीरंग पिंजरकर, माजी उपजिल्हाप्रमुख ज्ञानदेव परनाटे, संतोष अनासाने, एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव देविदास बोदडे, उपशहर प्रमुख पप्पू चौधरी, राजेश मिसे, गौरव अग्रवाल आदी प्रामुख्याने बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा… बुलढाणा : ‘महिलांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात’ राष्ट्रीय आदिवासी परिषदेचा रास्तारोको
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी संपर्कात असलेला गट पक्षात नाराज आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचे कार्य केल्यावरही आता जुन्या, जाणत्या शिवसैनिकांना बाजूला केले जात असल्याची खंत नाराज नेत्यांनी व्यक्त केली. बैठकीमध्ये खासदार शिंदेंसोबत पक्षप्रवेश व पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराज नेत्यांच्या पक्षप्रवेशावर अंतिम निर्णय होणार असल्याचे कळते. अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही जण शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा… फटाके फोडून, लाडू वाटून काँग्रेस कार्यकर्त्यांचा नागपुरात आनंदोत्सव
२५ जणांची यादी?
अकोला जिल्ह्याच्या ठाकरे गटातील २५ आजी-माजी पदाधिकाऱ्यांची यादीच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे. लवकरच त्यांच्या समर्थकांसह ते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे कळते.
ठाकरे गटातील नाराज नेत्यांसोबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एक बैठक घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. लवकरच मोठा प्रवेश सोहळा होईल – रामेश्वर पवळ, राज्य समन्वयक, शिवसेना, (शिंदे गट)