अकोला : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडूंच्या प्रहारला अकोल्यात जोरदार हादरा दिला आहे. जिल्ह्यातील प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंची साथ सोडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वार ठेऊन वंचित आघाडीत प्रवेश घेतला. यामुळे प्रहार पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख निखिल गावंडे यांच्यासह अकोट तालुका प्रमुख तुषार पाचकोर, संजय बुध, ग्रा. पं. लोतखेळ उपसरपंच विशाल नागरे यांनी सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचितच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवेंसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता. त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाकडून स्मृती गावंडे यांना सभापतिपद देवून वंचितवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला.
हेही वाचा >>> आधी म्हणाले, “बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही”, आता सूर बदलत म्हणाले, “बच्चू कडू…”
त्यानंतर प्रहार व वंचितमध्ये वाद रंगला होता. आता त्याच सभापतींच्या पतीने वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतल्याने प्रहारला धक्का बसला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने अकोट विधानसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत केले असतांना त्याच ठिकाणी पक्षात फूट पडली. प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे हे अकोट विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी तयारी करीत आहेत. त्याच मतदारसंघात प्रहारमधील असंतोष उफाळून आल्याने पक्ष नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.