अकोला : स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाशीम जिल्ह्यात सोमवारी पहाटे ५ वाजता खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. समृद्धीवर सातत्यपूर्ण अपघात घडत असल्याने महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यावरून नागपूरकडे जात असलेले राजलक्ष्मी ट्रॅव्हलच्या खासगी बसवरचे (क्र.एम.एच.१२ एच.जी. ६६६७) चालकाचे नियंत्रण गेले. त्यामुळे समृद्धी महामार्गावर चॅनेल क्र. २१५ वर नागपूर लेनवर वनोजा टोल प्लाझा पासून मालेगावकडे अंदाजे ५ किमीवर अपघात झाला. चालकाला झोपेची डुलकी आल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात एक जण ठार झाला असून, पाच ते सहा गंभीर जखमी झाले आहेत. १७ जण किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघातामधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी कारंजा आणि अकोला येथे रवाना करण्यात आले आहे. आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घगे, मंगरूळपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे, साई मंदिर येथे सकाळी व्यायाम करणारे नागरिक यांच्यासह वनोजा येथील नागरिकांनी अपघातातील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.

महामार्गावरील अपघातात दोन ठार

समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील चॅनल १८४ जवळ ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झालेल्या अपघातात चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी घडला. गजानन छोटू हिरवाणी (वय ४६, रा. सीतासावंगी, गोबरवाही, भंडारा) व आम्हीपाल महेश कुमार (४०, रा. नागपूर), अशी मृतांची नावे आहेत. नागपूरहून संभाजीनगरकडे जात असताना ट्रकचालकाला झोपेची डुलकी लागली, त्यामुळे ट्रकने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चालक आणि क्लि नरचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी रुग्णवाहिका १०८ चे पायलट रवींद्र शिंदे, डॉ. भास्कर राठोड, शेलूबाजार १०८ रुग्णवाहिकेचे चालक उल्हास खिल्लारे आणि डॉ. सचिन आडोळे घटनास्थळी दाखल झाले. समृद्धी फायर टीम आणि पोलिसदेखील मदतीसाठी हजर होते. पोलीस पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनात मोठी वाढ झाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola district samruddhi expressway bus accident near washim one died 25 seriously injured ppd 88 css