अकोला : विटाने भरलेल्या भरधाव ट्रकने स्कूल व्हॅनला जबर धडक दिल्याची घटना बाळापूर-वाडेगाव मार्गावर बुधवारी दुपारी घडली. या धक्कादायक घटनेमध्ये तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे संतप्त पालक व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून चौकशी सुरू केली आहे.

बाळापूर तालुक्यातून विटांची अवजड वाहतूक केली जाते. बाळापूर-वाडेगाव मार्गावर विटांची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र.एमएच ३० एल २९७७) गुरुकुल स्कूलच्या व्हॅनला (क्र.एमएच २८ सी ५९५४) जोरदार बुधवारी दुपारी धडक दिली. अपघातग्रस्त ट्रक पुढे जाऊन झाडाला धडकला. या अपघातात स्कूल व्हॅनमधील १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनचालक देखील जखमी झाले. या भीषण अपघातात स्कूल व्हॅनमधील पुढील भाग चक्काचूर झाला. विटांनी भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण गेल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ उपचारार्थ अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रोष व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विटांच्या अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले असून तत्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्यावर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या अपघातांमध्ये शेकडो जणांना प्राण गमवावे लागले. गंभीर व भीषण अपघातांमुळे अनेकांना अपंगत्व आले. रस्त्यावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्या आहेत. या वीट भट्ट्यांमधून संपूर्ण पश्चिम विदर्भात विटांची वाहतूक केली जाते. विटांची वाहतूक करतांना नियम पायदळी तुडवल्या जातात. ट्रकमध्ये मंजूरपेक्षा अधिक भार वाहून नेल्या जातो. परिणामी, ट्रकवरील नियंत्रण जाऊन अपघात घडतात. याच पद्धतीने बुधवारी विटांच्या भरधाव ट्रकने स्कूल व्हॅनला जबर धडक दिली. या अपघातात १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागासह पोलिसांनी वेळीच याची दखल घेऊन अवजड वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.