अकोला : जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने आपला दबदबा कायम राखला आहे. अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत वंचितने भाजपचा १३९४ मताने पराभव केला. या विजयामुळे अकोला जिल्हा परिषदेतील सत्ताधारी वंचितचे संख्याबळ वाढले आहे. चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीसाठी १७ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या पोटनिवडणुकीत ५८.५२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोट येथे सोमवारी मतमोजणी करण्यात आली.
एकूण वैध मतदान १०,००९ झाले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांनी ३,७८१ मते घेत प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार गजानन नाळे यांचा १३९४ मतांच्या अंतराने पराभव केला. गजानन नाळे यांना २,३८७ मते मिळाली. प्रहारचे जीवन खवले १७६५ मते घेऊन तिसऱ्या, शिवसेना ठाकरे गटाचे ११६० मतांसह चौथ्या, तर काँग्रेस पक्ष पाचव्या स्थानावर घसरला. काँग्रेसचे रवींद्र अरबट यांना केवळ ७६५ मतांवर समाधान मानावे लागले. नोटा पर्यायला १२१ मते पडली. अकोला जिल्हा परिषदेवरील वर्चस्व वंचितने पुन्हा एकदा सिद्ध केले.
हेही वाचा : “मी प्रश्न अदानींना विचारले, की उत्तर त्यांचे चमचे…”, उद्धव ठाकरेंची टीका
दरम्यान, या पोटनिवडणुकीवरून वंचित आघाडीने काँग्रेसवर निशाणा साधला. अकोल्यात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा निरर्थक ठरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेऊनही काँग्रेसचा पराभव झाल्याची टीका करण्यात आली. जनतेने एकहाती विजय मिळवून दिला, असा दावा देखील वंचितकडून करण्यात आला.