अकोला : घरगुती वाद कधी-कधी अतिशय टोकाला जातात. राग डोक्यात गेल्यावर क्रुरतेची परिसीमा गाठली जाते. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कारंजा शहरात घरगुती वादातून जन्मदात्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल मोखाडकर (वय ६०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाशीम जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कारंजा शहर एका घटनेने प्रचंड हादरले आहे. भावंड, पालक आणि मुलांमध्ये व्यवसायाच्या वादातून संघर्ष निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक कलाहावर वेळीच तोडगा न काढल्यास मोठा अनर्थ घडत असतो. छोटे-मोठे वाद कधी मोठे होऊन एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत पोहोचतील, हे कळत सुद्धा नाही. कौटुंबिक कलाहातून हिंसाचाराला वाव मिळतो. कौटुंबिक कलहामागे मालमत्ता, जमीन, पैसा आदी कारणे असू शकतात. याच प्रकारच्या कौटुंबिक कलहातून वाशीम जिल्ह्यात पित्यानेच मुलाचा जीव घेतल्याचा प्रकार घडला.

कारंजा येथील रहिवासी गोपाल मोखाडकर आणि त्यांचा मुलगा अनिल गोपाल मोखाडकर यांच्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास घरगुती कारणावरून मोठा वाद झाला. हा वाद रात्रभर सुरूच होता. त्यानंतर पिता-पुत्रामधील हा वाद आज सकाळी आणखी उफाळून आला अनिल मोखाडकर यांनी हा वाद पुन्हा सुरू केल्याचे बोलल्या जाते. या वादातून वडील व मुलामध्ये हाणामारीला सुरुवात झाली. रागाच्या भरात आरोपी बापाने अनिल मोखाडकर यांच्या पोटात चाकू भोसकला. चाकूने तीन ते चार गंभीर वार केले. यामध्ये अनिल मोखाडकर गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. कारंजा पोलिसांनी संशयित आरोपी बापाला ताब्यात घेतले. कारंजा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारंजा शहरातील जन्मदात्या वडिलांकडून आपल्या पोटच्या मुलाची हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.