अकोला: हैदराबाद येथे नोकरी लावून देण्याच्या नावावर नेऊन १८ वर्षीय मुलाचे धर्मपरिवर्तन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्याच्या चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत आलेगाव येथे उघडकीस आला. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.
आलेगाव येथील ज्योती राजेश दाभाडे (४८) यांनी १२ जुलै चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, चार महिन्यांपूर्वी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या अलताफ गादीवाले, अंसार गादीवाले यांनी मुलगा शुभम याला कामासाठी हैदराबाद येथे नेले. मुलाचा फोन लागत नव्हता. हैदराबाद येथे दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहिले असता तिथेही मुलगा आढळला नाही. तो बुलढाणा जिल्ह्यातील उंद्री येथे मदरसामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्याला तेथून परत आणले. मुलगा घरी आल्यानंतर त्याच्या खिशामध्ये धर्मपरिवर्तन केल्याचे कागदपत्रे आढळून आली.
अलताफ गादिवाले, अंसार गादिवाले, शेख तजवीर, शेख आजीम शेख मंजूर यांना मुलाच्या धर्मपरिवर्तनासंदर्भात विचारणा केली असता ‘तुम्ही टेंशन घेऊ नका’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर चारही आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर येत त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा… वाशीम : जोरदार पावसामुळे पुलाजवळील भाग खचला, एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला
ज्योती दाभाडे यांच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी चारही आरोपींविरूद्ध ॲट्रासिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज, यांच्या मार्गदनाखाली विपुल पाटील यांनी केली.