अकोला : सामान्य श्रेणीतील प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेद्वारे वेगवेगळ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील सामान्य श्रेणीच्या डब्यांची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सामान्य श्रेणी डब्यांमध्ये तर प्रचंड गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ विभागातून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामान्य श्रेणी डबे बसवण्यात येणार आहेत.
यामध्ये विदर्भ एक्सप्रेस, एलटीडी – बनारस एक्सप्रेस, एलटीडी – पाटलीपूत्र एक्सप्रेस, शालीमार एक्सप्रेस, एलटीडी – हावडा एक्सप्रेस, एलटीडी – पुरी एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई – हावडा मेल, हटिया एक्सप्रेस, हावडा – अहमदाबाद एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, रांची एक्सप्रेस या गाड्यांना प्रत्येकी दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार आहेत, तर मुंबई – अमृतसर एक्सप्रेस, एलटीडी – अयोध्या, एलटीडी – बलिया, एलटीडी – जयनगर एक्सप्रेस, एलटीडी – बल्लारशाह एक्सप्रेस, एलटीडी – छपरा एक्सप्रेस, एलटीडी – गोरखपूर एक्सप्रेस, एलटीडी – सुलतानपूर एक्सप्रेस, एलटीडी – सीतापूर एक्सप्रेस, एलटीडी – प्रतापगड एक्सप्रेस, एलटीडी – आग्रा एक्सप्रेस, एलटीडी – राणी कमलापती एक्सप्रेस, पुणे – दानापूर एक्सप्रेस, मुंबई – अमरावती अंबा एक्सप्रेस, पुणे – काजीपेठ एक्सप्रेस, पुणे – लखनौ एक्सप्रेस, पुणे – जसडीह एक्सप्रेस या गाड्यांना प्रत्येकी एक सामान्य श्रेणीचा डब्बा जोडला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा : नागपूरच्या विमानसेवेला फटका, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान रद्द, दिल्लीच्या विमानांना विलंब
इतर श्रेणीतील प्रवाशांनाही दिलासा मिळणार
प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असलेल्या मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या विविध गाड्यांमध्ये अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डब्बे वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. त्याचा मोठा लाभ सामान्य श्रेणी तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहेच, याशिवाय रेल्वेत इतर श्रेणीत प्रवास करणाऱ्यांना देखील दिलासा मिळेल. आरक्षित डब्यांमधून अनारक्षित तिकिटावर किंवा प्रतीक्षा यादीतील तिकिटावर प्रवास करणाऱ्यांची गर्दी असते. रेल्वेने कडक नियम केल्यानंतरही आरक्षित डब्यांमधील अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश कमी झालेला नाही. त्याचे मुख्य कारण सामान्य श्रेणीतील डब्यांमध्ये जीवघेणी गर्दी हेच आहे. आता रेल्वे गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीच्या डब्यांची संख्या वाढणार असल्याने काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. आरक्षण डब्यांमधील अनधिकृत प्रवास करणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी होणार असल्याने त्या श्रेणीतील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. रेल्वेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रवाशांसाठी सुविधाजनक होणार आहे.