अकोला : आकाशातील विविध घटना, घडामोडी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतात. मानव निर्मित महाकाय आकाराचे ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ अर्थात अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र सलग तीन दिवस लक्ष वेधून घेणार आहे. हे केंद्र ज्या भागातून जाते, त्याठिकाणी ते पाहता येते. येत्या ४, ५ आणि ७ डिसेंबरला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी या केंद्राचे दर्शन अवकाशात घडणार आहे. एक तेजस्वी चांदणी आकाशात सरकताना दिसेल, हे अनोखे आकाश दृश्य अवकाश प्रेमींनी अवश्य अनुभवावे, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.
१६ प्रगत देशांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्राचा भव्यदिव्य प्रकल्प मानवी कल्याणार्थ व नव संशोधनार्थ शून्य गुरुत्वाकर्षणात कार्यरत आहे. हे केंद्र दिवसाला १५ पृथ्वी प्रदक्षिणा घालते. दर सेकंदाला सुमारे साडेसात कि.मी.वेगाने हे केंद्र पुढे सरकते. सध्या स्थितीत दहा वैज्ञानिक या केंद्रात असून पृथ्वीपासून सुमारे चारशे कि.मी दूर हे केंद्र कार्यरत आहे. अंतराळ संशोधन केंद्राचा आकार हा फुटबॉल मैदाना पेक्षाही खूप मोठा आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी या केंद्राचे दर्शन होणार आहे. ४ डिसेंबरला रात्री ७.१६ ते ७.२० या वेळेत वायव्य ते दक्षिण पश्चिमेस सुमारे ४७° उंचीवरुन हे केंद्र जाईल. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.२८ ते ६.३४ या वेळेत वायव्येकडून आग्नेयेकडे सुमारे ६९° उंचीवरुन पाहता येणार आहे. ७ डिसेंबरला सायंकाळी ६.२७ ते ६.३३ या वेळेत क्षितिजापासून २४° वरुन पश्चिम-उत्तरकडून शूक्र ग्रहा जवळून दक्षिणेकडे जाताना दिसणार आहे.
हेही वाचा : दोन मुलांना शाळेत सोडताना तीन हेल्मेट हाताळायचे कसे? संतप्त महिला पालकांचा सवाल
महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी या अनोख्या आकाश नजाऱ्याचा आनंद घेता येईल. मात्र, स्थानपरत्वे मुंबई ते नागपूरकडे जाताना वेळेत किंचित वाढ तर उंची, दिशा, तेजस्वीतेत काही बदल होताना दिसणार आहे, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली.
हेही वाचा : वर्धा : शपथविधी आणि मंत्रीपदासाठी लॉबिंग, मात्र ‘हे’ चार म्हणतात…
फिरत्या चांदणीसोबतच ग्रह दर्शनाचा अलौकिक योग
अवकाशात फिरत्या चांदणीची पर्वणीसोबतच ग्रह दर्शन देखील घडणार आहे. पश्चिम आकाशात तेजस्वी शुक्र, दक्षिण आकाश मध्याशी वलयांकित शनी ग्रह आणि सध्या स्थितीत पृथ्वीच्या जवळ येत असलेला गुरु ग्रह पूर्व क्षितिजावर दिमाखात दर्शनास सज्ज आहे. अवकाशातील अलौकिक नजाऱ्याचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले.