अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर मोरगाव भाकरे येथे साेमवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदल व पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. वीज सुपुत्राला साश्रुनयनांनी गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी ‘शहीद जवान, अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.
कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला प्राप्त झाली होती. सुरक्षा दलाच्या पथकाने दहशतवादविरोधी कारवाई शनिवारी दुपारी सुरू केली. सुरक्षा पथक व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ (२४) हे जवान शहीद झाले. जंजाळ हे भारतीय सैन्य दलाच्या सेकंड महार रेजिमेंटमध्ये २०२० मध्ये दाखल झाले होते. प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुट्टीवर आले असतांना त्यांचे लग्न झाले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते.
हेही वाचा: अकोला जिल्ह्यात कोसळधारा! घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू; ८३ घरांची पडझड, दोन तालुक्यात अतिवृष्टी
दरम्यान, शहीद प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्यदलाच्या तुकडीकडून साेमवारी दुपारी मूळ गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंत वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्यावतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. ‘शहीद प्रवीण जंजाळ, अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला होता. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.
हेही वाचा: शिव्यांच्या उच्चाटनासाठी अमरावतीकर राबविणार अभियान…
मोरगांव भाकरे सैनिकांचे गाव
सैनिकांचे गाव म्हणून मोरगांव भाकरे गावाची ओळख आहे. या गावातून आजपर्यंत ९० युवक सैन्यात भरती झालेले आहेत. जंजाळ कुटुंबातून देखील सैन्यदलात तीन जण दाखल झाले. प्रवीण जंजाळ त्यांच्या पूर्वी त्यांचे मोठे वडील भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रवींद्र जंजाळ हे सैन्यदलात होते.