अकोला : राज्यातील ३.९३ कोटी ग्राहकांच्या ‘ऊर्जे’साठी जीवावर उदार होऊन रात्रंदिवस कार्य करणारे लाईनमन अद्याप दुर्लक्षित घटकच आहेत. प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थितीत खांबावर चढत जीव मुठीत घेऊन लाईनमन कर्मचारी आपले कर्तव्य निभावतात. त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ४ मार्च हा ‘लाईनमन दिवस ‘ साजरा करण्याचे निश्चित केले आहे.

विजेने मानवी जीवन सहज आणि सुसह्य केले. २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारे हात म्हणजे महावितरणचे लाईनमन. महावितरणचे सुमारे ८१ हजार कर्मचारी, रक्तवाहिन्याप्रमाणे पसरलेल्या १२ लाख किलोमीटरच्या वीज वाहिन्या, चार हजार १३२ उपकेंद्रे, आठ लाख ७५ हजार ३३९ रोहित्राच्या माध्यमातून २५ हजार मेगावॉट वीज राज्यातील विविध वर्गवारीतील तीन कोटी सात लाख ९३ हजार ९६८ ग्राहकांपर्यंत अखंड पोहचविण्याच काम महावितरणचा लाईनमन अविरत करीत असतो.

वीज खंडित झाल्यास ती परत कशी येते व यंत्रणा कशी चालते, हे सामान्यपणे जाणून घेतले जात नसल्याने लाईनमन आजवर दुर्लक्षितच राहीला. ठप्प झालेली किंवा रात्री-बेरात्री खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाईनमन प्रसंगी प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थितीत खांबावर, रोहित्रावर चढून काम करतात. वीज यंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूक ही जीवावर बेतू शकते. महावितरणची उघड्यावर असलेली संपूर्ण यंत्रणा, जंगल, दऱ्या-खोऱ्यातून आलेल्या वीज वाहिन्या, वीज खांबे, रोहित्रे आदीवर उन्ह, वादळ-वारा, पाऊस याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे वीज यंत्रणेची नियमित देखभाल-दुरूस्ती करतांना किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रसंगी एखादा बिघाड शोधण्यासाठी शेकडो कि.मी. वीज वाहिन्यांची तपासणी करावी लागते. पावसाळ्यात तर अशा आव्हानांची नियमितपणे भर पडत असते. महावितरणचा लाईनमन आव्हानांना समर्थपणे तोंड देत वीज ग्राहकांसाठी कार्य करतो.

‘लाईनवुमन’चे खांद्याला खांदा लाऊन कार्य

एकेकाळी फक्त पुरूषप्रधान असलेल्या वीज क्षेत्रात ‘लाईनवुमन’ पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन सक्षमपणे कर्तव्य बजावतात. वीज पुरवठा सुरळीत करण्यावरच लाईमनचे काम थांबत नाही तर, विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणी देणे, वीजबिलाची वसुली, वीज चोरी पकडणे, थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणे, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे आदी कामे करतात, अशी माहिती महावितरणच्या अमरावती परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी दिली.

Story img Loader