अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप व वंचित आघाडीच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले असून ते प्रचाराला देखील लागले आहेत. दुसरीकडे अद्यापही काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली नसून उमेदवाराची प्रतीक्षा लागली आहे. काँग्रेसने अकोल्यात उमेदवार दिल्यास पुन्हा एकदा तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जात असून खासदार संजय धोत्रे गेल्या दोन दशकांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे यावेळेस त्यांचे पूत्र अनुप धोत्रे यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. आपल्या पारंपरिक मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर अकराव्यांदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे.
हेही वाचा : रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द; निर्णयाविरोधात तातडीने सुनावणीस न्यायालयाचा नकार
प्रमुख दोन पक्षांचे चित्र स्पष्ट झाले. त्यांची प्रचार मोहीम देखील सुरू आहे. काँग्रेस मात्र अद्यापही तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेत आहे. वंचितने ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे वंचितची ‘मविआ’तील सहभागाची शक्यता मावळली आहे. अकोल्यात काँग्रेसने आतापर्यंत मराठा, मुस्लीम व माळी कार्ड वापरले. आता काँग्रेस कुठला प्रयोग करणार याकडे लक्ष राहणार आहे. अकोल्यात काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांचे नाव चर्चेत आहे. २०१९ मध्येही ते इच्छूक होते. गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली. काँग्रेसने अकोला पश्चिमच्या पोटनिवडणुकीसाठी साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर करून अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व दिले होते. मात्र, आता पोटनिवडणूक रद्द झाल्याने काँग्रेसला नव्या समीकरणावर विचार करावा लागणार आहे. दरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या राज्यातील सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्षांना पाठवला. वंचितने काँग्रेसच्या दोन उमेदवारांना बिनशर्त समर्थन देखील जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसवर आता दबाव वाढला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाठिंबा देण्याचा काँग्रेस अंतर्गत एक मतप्रवाह आहे. अकोल्यात काँग्रेस उमेदवार देणार की वेगळी काही खेळी खेळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार
शेवटच्या क्षणी उमेदवार देण्याची परंपरा
दर लोकसभा निवडणुकीपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चेचे सत्र चालते. मात्र, अंतिम क्षणापर्यंत एकमत होत नाही. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात काँग्रेस अकोल्यात उमेदवार देत असल्याची परंपरा आहे. हेच चित्र या निवडणुकीत सुद्धा दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये काँग्रेसकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.