अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेला कुणबी समाज सध्या केंद्रस्थानी आहे. या गठ्ठा मतपेढीवर प्रमुख नेत्यांचे लक्ष असून ते आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. उमेदवारीसाठी देखील कुणबी समाजातील काहींची नावे अचानक चर्चेत आली आहेत. जातीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यावर प्रमुख पक्षांचा भर आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली. येत्या एक-दोन दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीला जोर आला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे.
हेही वाचा…नाथुराम हिंदू महासभाची घोषणा, संघभूमीतून निवडणूक….
आपला गड कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे राहील. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखले. मात्र, सध्या प्रकृती अस्वास्थामुळे ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. परिणामी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नवा उमेदवार द्यावा लागेल. त्या दृष्टीने भाजपची गेल्या काही महिन्यांपासून चाचपणी सुरू आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी खासदार पुत्र अनुप धोत्रेंसह अर्धा डझन इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारीवर अद्याप वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केलेले नाही.
‘वंचित’च्या महाविकास आघाडीतील समावेशाचे भिजत घोंगडे कायम आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत:ची उमेदवारी अकोल्यातून जाहीर केली. गेल्या काही महिन्यांपासून भेटीगाठी व मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रचार मोहीम देखील सुरू केली आहे. भाजप आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पूर्ण विचाराअंती उमेदवाराच्या नावावर मोहर उमटवतील.
हेही वाचा…अकोला : भाजपचे बेरजेचे राजकारण, ‘उबाठा’ सेनेसह महायुतीतील मित्र पक्ष प्रहारला धक्का
लोकसभा निवडणुकीतील यशासाठी जातीय समीकरण जुळून येण्याची गरज असते. त्या दृष्टीने राजकीय पक्ष मांडणी करीत आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात कुणबी समाजाचे सुमारे अडीच लाख मतदार असल्याचा दावा समाजातील नेत्यांकडून करण्यात येतो. त्याच्या आसपासच कुणबी समाजाची मतदार संख्या असल्याने प्रमुख राजकीय पक्षांचे त्याकडे लक्ष आहे.
वंचित आघाडीने सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांमध्ये समाजाला वारंवार प्रतिनिधित्व देऊन झुकते माप दिले. त्यातच समाजाच्या मेळाव्याला ॲड. प्रकाश आंबेडकरांनी हजेरी लावली. गठ्ठा मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भाजपच्या रणनीतीत देखील कुणबी समाजाचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याची माहिती आहे. कुणबी समाजाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. याशिवाय खामगावचे आमदार आकाश फुंडकर, अकोला अर्बनचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर यांचे नाव उमेदवारीसाठी अचानक चर्चेत आलेत. यातील एक नाव संघ परिवारातून समोर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामागे कुणबी समाजाचे गठ्ठा मतदान हे प्रमुख कारण असल्याचे कळते. भाजप गांभीर्याने त्यावर विचार करीत आहे की केवळ चाचपणीसाठी नावे समोर करण्यात आली, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.
हेही वाचा…नागपूर विद्यापीठात ‘रामजन्मभूमी न्यास’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव! अधिसभेच्या विषयपत्रिकेवरून टीका
काँग्रेस संभ्रमातच
काँग्रेस वंचितसोबत आघाडी होणार की नाही, या संभ्रमातच असून आघाडी न झाल्यास शेवटच्या क्षणी काँग्रेस उमेदवार देतील. काँग्रेसने गेल्या तीन दशकात कुणबी समाजाला प्रतिनिधित्व दिलेले नाही. त्यामुळे कुणबी समाजात नाराजी आहे. काँग्रेस आता त्यावर प्रयोग करणार का? याकडे राजकीय वर्तुळाले लक्ष राहणार आहे.