अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या अंतिम टक्केवारीत वाढ झाली. मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाल्याचे निवडणूक विभागाने शनिवारी स्पष्ट केले. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्याने मतदारांमधील निरुत्साह दिसून आला. शहरीच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदान अधिक झाले.
अकोला मतदारसंघातील दोन हजार ०५६ मतदान केंद्रावर शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ७ ते ९ या कालावधीत ७.१७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत १७.३९ टक्के, तर दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३२.१५ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.४०, तर ५ वाजेपर्यंत ५२.६९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा : नागपूर: मतदारांनो तुम्हीच जबाबदार, जिल्हा प्रशासनाचा अजब दावा
शेवटच्या एका तासात मतदारांनी केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले. मतदारसंघातील अनेक केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरूच होते. निवडणूक विभागाकडून रात्री उशिरापर्यंत मतदानाच्या आकडेवारीची जुळवाजुळव करण्यात आली. अधिकृत आकडेवारी शनिवारी जाहीर केली. अकोला मतदारसंघात एकूण मतदान ६१.७९ टक्के झाले आहे. १८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३४८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानात बाळापूर मतदारसंघात सर्वाधिक ६६.५८, तर अकोला पश्चिममध्ये सर्वात कमी ५४.८७ टक्के मतदान झाले. याशिवाय अकोट ६४.०२, अकोला पूर्व ५९.३६, मूर्तिजापूर ६४.५२ आणि रिसोड मतदारसंघात ६२.४३ टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील मतदानात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.