अकोला : अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती, महाविकास आघाडी व वंचितमध्ये तिरंगी सामना होत आहे. राज्यात सोयीच्या राजकारणामुळे अनेक पक्ष महायुती किंवा ‘मविआ’च्या झेंड्याखाली एकत्रित आले आहेत. वरिष्ठ पातळीवरून निर्णय झाला तरी मतदारसंघस्तरावर घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये दिलजमाई होणार का? हा खरा प्रश्न आहे. महायुती व आघाडीच्या निर्णयामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यामुळे मित्र पक्षांचे नेते महायुती व आघाडी धर्म पाळून निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत उमेदवारांसाठी सक्रीय काम करणार का? यावरून संशयाचे वातावरण आहे. मित्र पक्षांच्या नेत्यांना महत्त्व व मानाची अपेक्षा असून उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

राजकीय भूकंपानंतर गटातटात विभागलेले प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या सोयीनुसार महायुती व ‘मविआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये एकत्रित आलेत. राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइंसह एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. भाजपला रोखण्यासाठी समविचारी मित्रपक्षांची एकत्रित महाविकास आघाडीची मोट काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट व इतर पक्षांनी बांधली आहे. वंचित व ‘मविआ’चे सूर यावेळेसही जुळले नाहीत. त्यामुळे अनेक मतदारसंघात त्रिकोणी लढतीचे चिन्हे आहेत.

हेही वाचा : नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?

राज्यातील महायुती व आघाडीच्या समीकरणामध्ये अनेक मतदारसंघ स्तरावर उमेदवार व नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे चित्र आहे. अकोला मतदारसंघात जातीय राजकारण व मतविभाजनाचे प्रभावी समीकरण नेहमीच दिसून येते. यावेळेस देखील परंपरेनुसार पुन्हा भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये लढत आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर रिंगणात असून त्यांच्यात तुल्यबळ सामना रंगण्याची शक्यता आहे. प्रचार मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवारांकडून भेटीगाठी, मेळाव्यांवर भर दिला जात आहे. प्रचाराने अपेक्षित असा वेग पकडलेला नाही. काही निवडक अपवाद वगळता मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते प्रचारात सक्रीय साथ देत नसल्याचे दिसून येते. यासर्व प्रकारावरून उमेदवारांची मात्र चांगलीच कोंडी होत आहे.

हेही वाचा : Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात

महत्त्व दिल्या जात नसल्याने प्रहारने अकोल्यात महायुतीला सोडून ‘मविआ’ला पाठिंबा दिला. ‘मविआ’तील घटक पक्षांमध्ये सुद्धा चित्र काही वेगळे नाही. दोन्ही बाजूच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. पक्षांतर्गत नाराज स्वकीय व मित्र पक्षातील नेत्यांची समजूत काढण्यातच उमेदवारांचा बराच वेळ खर्ची जात आहे. विरोधात छुप्या कारवाया देखील होण्याचा धोका उमेदवारांना असल्याने ते सतर्क आहेत. उमेदवार आपल्याला किती महत्त्व देणार? असा प्रश्न मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये असून अंतर्गतच मानापनात नाट्य रंगत आहे.

हेही वाचा :वर्धा : ‘या’ आजी घरपोच मतदानाच्या पहिल्या मानकरी

लहान घटक पक्ष दुर्लक्षित

महायुती व आघाडीमध्ये छोटे घटक पक्ष दुर्लक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. छोटे-मोठे पक्ष व संघटनांना एकत्रित करून महायुती व ‘मविआ’ अस्तित्वात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत लहान पक्षांना महत्त्व दिले जात नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

Story img Loader