अकोला : विटांची वाहतूक करणाऱ्या मिनी ट्रकने दोन दुचाकींना जबर धडक देऊन विचित्र अपघात झाल्याची घटना बार्शिटाकळी तालुक्यातील रेडवा टी-पाईंटजवळ शनिवारी घडली. या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

बार्शिटाकळी तालुक्यात रेडवा टी-पाईंटजवळ चोहट्टा बाजार येथील विटांची अवजड वाहतूक करणाऱ्या भरधाव मिनी ट्रकने (क्रमांक एमएच २८ एच ९६४६) विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जबरदस्त धडक दिली. अपघातानंतर हा मिनी ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळला. मिनी ट्रकच्या जोरदार धडकेत एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिनी ट्रक चालक व ट्रकमधून वाहतूक करणारे मजूर ट्रकमधील विटांखाली दबल्याने जखमी झाले. दुचाकीवरील इतर जण देखील जखमी झाले. मृतकाची ओळख पटली नव्हती. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रुग्णवाहिकांमधून मृतकासह सात जखमींना उपचारार्थ अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. काहींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहते रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. बार्शिटाकळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक

जिल्ह्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले. त्यामुळे अपघाताची संख्या देखील वाढल्याचे चित्र दिसून येते. बार्शिटाकळी तालुक्यातील दोनद येथे यात्रा महोत्सव सुरू आहे. त्यामुळे यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी असते. भाविकांची वाहतूक करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेले जातात. विटा आणि रेतीची अवैध वाहतूक केली जाते. भरधाव व अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढतो. त्याचा प्रत्यय आज बार्शिटाकळी तालुक्यात झालेल्या अपघातावरून आला. अवैध वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता आहे. पोलिसांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम राबविण्याची गरज दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. अवैध वाहतूक रोखण्याची मागणी होत आहे.