अकोला : राज्यात महायुतीमध्ये एकूण १५ घटक पक्षांचा समावेश आहे. या १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. १५ पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी १४ जानेवारीला मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे भरीव विकासात्मक कार्य सुरू आहे. देशातील १४० कोटी जनतेचा विश्वास नरेंद्र मोदी यांनी संपादित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार सर्वांगीण विकास करीत आहेत. सरकारने विकासाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच शासन आपल्या दारी अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढले आहेत. राज्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी महायुती सरकारने पूर्ण प्रयत्न आहेत. केंद्र व राज्य सरकारने राबवलेले विकास कार्य जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आगामी लोकसभा निवडणूक १५ पक्षांचा समावेश असलेली महायुती म्हणून लढली जाणार आहे, असे आ. रणधीर सावरकर यांनी सांगितले.
हेही वाचा : अनैतिक संबंधातून मित्राच्या पत्नीचा खून, मृतदेह पोत्यात बांधून…
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील समाविष्ट भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, प्रहारसह इतर प्रमुख पक्ष तयार आहेत. संख्यात्मकसह आमची भाविकदृष्ट्या देखील युती झाली आहे. युतीमध्ये सामील झालेल्या विविध पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांचा समन्वय वाढण्यासाठी १४ जानेवारी रोजी समन्वय मेळावे आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याचे आ.रणधीर सावरकर म्हणाले.
हेही वाचा : पेपर फुटीच्या संशयावरून आंदोलन; पीएच.डी. अधिछात्रवृत्ती चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सीलबंद नसल्याचा आरोप
अकोला शहरात १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता स्थानिक खुले नाट्यगृह येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यात महायुतीतील १५ घटक पक्षांचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील, असे आ.सावरकर यांनी सांगितले. यावेळी विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, शिवसेनेचे उपनेता तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर, अनुप धोत्रे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : रेल्वेमार्गाचे मोदींच्या हस्ते होणारे उद्घाटन रद्द; श्रेयासाठी वाद झाल्याने निर्णय
नेत्यांच्या उपस्थितीत विभागीय मेळावे
महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विभागीय मेळावे होणार आहेत, अशी माहिती देखील आ. सावरकर यांनी दिली.