अकोला: मराठी चित्रपटांना ‘मल्टीप्लेक्स’ चित्रपटगृहात सापत्न वागणूक दिली जाते. ‘बाईपण भारी देवा’ मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांनाही अकोल्यातील मिराज सिनेमा चित्रपटगृहाने मुख्य ठिकाणी चित्रपटाचे फलक न लावल्याने मराठी रसिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्रटपगृहावर धडक देत व्यवस्थापकांना समज दिली. उद्यापर्यंत मराठी चित्रपटाचे फलक न लावल्यास इतर चित्रपट सुरू राहू देणार नाही, असा इशारा मनसेने दिला.
‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट स्थानिक मिराज चित्रपटगृहात सुरू आहे. रसिकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे फलक मुख्य बोर्डावर लावण्यात आलेले नाही. त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिरज सिनेमा येथे धडकले. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे मोठे फलक मुख्य बोर्डावर न लावल्यास उद्यापासून इतर चित्रपट सुरू राहू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. यावर व्यवस्थापकांनी लवकर फलक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.
हेही वाचा… वंदे भारत एक्सप्रेसला अचानक प्रतिसाद वाढला, जाणून घ्या कारण…
यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, शहराध्यक्ष सौरभ भगत , जिल्हा सचिव ललित यावलकर, जिल्हा सहसचिव मोहन मते, शहर उपाध्यक्ष सोनु अवचार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.