अकोला : वाढत्या वयात मातृत्व स्वीकारणाऱ्या मातांच्या बाळाला ‘डाउन सिंड्रोम’ चा अधिक धोका असतो. ‘डाउन सिंड्रोम’ ही एक वैद्यकीय स्थिती आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये अतिरिक्त गुणसूत्र आढळून येतात, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. जागतिक ‘डाउन सिंड्रोम’ दिन हा एक जागतिक आरोग्य सेवा कार्यक्रम आहे. दरवर्षी २१ मार्च रोजी या रोगाबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीचे ‘विथ अस नॉट फॉर अस’ हे घोषवाक्य आहे.
लहान डोके, चपटा चेहरा, लहान मान, बाहेर पडणारी जीभ, वरच्या दिशेने तिरपे डोळ्यांचे झाकण, जन्मजात हृदयाचे दोष, आतड्यांसंबंधी अडथळा, हाडांच्या वस्तुमानात घट झाल्यामुळे फ्रॅक्चरचा धोका आदी आजाराची लक्षणे आहेत. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता किंवा वाढ होते. मंदता, कमी उंची, रुंद, लहान हात, बोटे आणि लहान पाय, श्वासोच्छ्वासाचे समस्या, श्रवण कमी होणे आणि कानाचे संक्रमण, विकासाशी संबंधित समस्या, काही प्रमाणात बौद्धिक विकासाची समस्या, बोलण्यात आणि भाषा समजण्यात अडचणी, सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी आदी त्रास उद्भवू शकतो, असे डॉ. गाढवेंनी सांगितले.
विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये आणि विकासात्मक अपंगत्व
मुलाला त्याच्या पालकांकडून ४६ गुणसूत्रांच्या रूपात अनुवांशिक सामग्री मिळते. त्यामध्ये २३ वडिलांकडून आणि २३ आईकडून प्राप्त होते. ‘डाउन सिंड्रोम’ मध्ये बाळाला वारशाने अतिरिक्त गुणसूत्र प्राप्त होते. काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त गुणसूत्र २१ दुसऱ्या गुणसूत्राशी जोडले जाते. या अतिरिक्त अनुवांशिक सामग्रीमुळे ‘डाउन सिंड्रोम’ व्यक्तींमध्ये विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये आणि विकासात्मक अपंगत्व निर्माण होते. अतिरिक्त गुणसूत्र स्वतःहून किंवा दुसऱ्या गुणसूत्राशी जोडलेले असेल, तर वैशिष्ट्ये समान असतात, असे ते म्हणाले.
‘डाउन सिंड्रोम’ अनुवंशिक देखील
३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना ‘डाउन सिंड्रोम’ असलेल्या मुलाला जन्म देण्याचा धोका जास्त असतो. ‘डाउन सिंड्रोम’ अनुवंशिक देखील राहू शकते. ‘डाउन सिंड्रोम’ असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ही सर्व लक्षणे नसतात, काही जण पूर्णपणे निरोगी असू शकताे. आजारग्रस्त व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकतात, शिकू शकतात आणि काम करू शकतात. बाळाला किंवा कुणालाही ‘डाउन सिंड्रोम’ची लक्षणे दिसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. बळीराम गाढवे यांनी केले.