अकोला : संपुआ सरकारच्या काळात शेतकऱ्यांना ६७ हजार कोटींचे कर्ज एकदम माफ केले होते. आता सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. केवळ वेगवेगळे प्रस्ताव आणले जातात. सत्ताधाऱ्यांकडून शेतकरी, कष्टकऱ्यांना नव्हे तर शेकडो, हजारो कोटींचे कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्यांना कर्जमाफी दिली जात आहे, अशी जहरी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोल्यात गुरुवारी आयोजित सहकार महर्षी कै. डॉ.वा.रा. कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समारोप व सहकार महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून दुरदृश्यप्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री आ.अनिल देशमुख, आ.नितीन देशमुख, आ.अमित झनक, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, अकोला व वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.संतोष कोरपे, कृषी तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, अकोला बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ‘मिथेन’चे साठे; पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सर्वेक्षणात…

पुढे शरद पवार म्हणाले, आज शेती आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. कापूस उत्पादन घसरले. शेतकरी सोयाबीनकडे वळत आहेत. सोयाबीन सुद्धा संकटात आले. नव्या पिढीने शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे आहे. शेती संदर्भात शासनाचे धोरण चुकीचे आहेत. आयात-निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले. कांदा रस्त्यावर फेकल्या गेला. आता हीच स्थिती संत्रा, कापूस उत्पादकांची होत आहे. शेतकऱ्यांची बांधिलकी नसलेला नेता निवडून देऊ नका. राज्य कुणाच्या हातात द्यायचे ते तुम्ही ठरवा, शेतकऱ्यांचेहित पाहणाऱ्याला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण केले जात आहे. पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे जबाबदारी राहणार नाही. शाळा खासगी कंपन्यांना दत्तक दिली जाते. नाशिक जिल्ह्यातील शाळा दारू कंपनीला दिली. त्या शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला, विद्यार्थ्यांनी आता काय शिकावे? असा सवाल करत त्यांनी सरकारी धोरणावर टीका केली.
सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत तळमळीने अण्णासाहेब कोरपे मांडत होते. शेतकरी, शेती, सहकार यासाठी त्यांनी जीवन वाहून घेतले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते सक्रिय होते. कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर त्यांच्याशी संपर्क आला. कापूस दिंडीच्या वेळी त्यांनी योग्य नियोजन केले. त्यावेळी त्यांना दिंडी येण्यापूर्वी अटक केली होती. कापूस दिंडी यशस्वी होण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. सहकार मजबूत करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी आजीवन संघर्ष केला. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : “जातनिहाय जनगणना कराच, परंतु त्याआधी उद्दिष्टे ठरवा,” ‘लोकसत्ता’सोबतच्या चर्चेत तज्ज्ञांचा सूर

नितीन गडकरी म्हणाले, अण्णासाहेब कोरपे यांनी शेतकऱ्यांसाठी आपले जीवन समर्पित केले होते. समाज कल्याणाचा त्यांनी ध्यास घेतला होता. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. सहकार क्षेत्रात त्यांनी आदर्श निर्माण केला. समाजवादी विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. सत्ताकारणपेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे. ही शिकवण त्यांच्याकडून घेण्याची आवश्यकता आहे.
आ. अनिल देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्याचे कार्य अण्णासाहेब कोरपे यांनी केले. कापूस उत्पादकांचे प्रश्न त्यांनी मांडले. नव्या पिढीसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. कापूस उत्पादक सध्या संकटात आहे. कापसाची आयात झाल्याने भाव पडले. कापसाची निर्यात सुद्धा झाली नाही. कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लक्ष घातले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : काँग्रेसच्या नागपूरमधल्या बैठकीत तुफान राडा, नाना पटोलेंसमोरच पदाधिकारी आपसांत भिडले

जयंत पाटील म्हणाले, अण्णासाहेब कोरपे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. २००४ अगोदर कापूस २५ लाख क्विंटल कापूस आयात करीत होता. शरद पवार यांच्या १० वर्षांच्या कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळानंतर ७० लाख क्विंटल कापूस निर्यात करणारा देश ठरला. गेल्या १० वर्षांत पुन्हा परिस्थिती खालावली आणि आता पुन्हा कापूस आयात करण्याची वेळ शासनाने आणली, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली. कापसाचे पीक अडचणीत आले असून उत्पादन कमी-कमी होत आहे. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असतांना कृषी उत्पादनात प्रचंड सुधारणा होऊन दुसरी हरितक्रांती झाली होती, असे डॉ.सी.डी. मायी म्हणाले. सहकारी संस्थांचे सक्षमीकरण होण्याची गरज डॉ.संतोष कोरपे यांनी प्रस्ताविकात व्यक्त केली. सूत्रसंचालन अनंत खेळकर यांनी, तर आभार नानासाहेब हिंगणकर यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola ncp leader sharad pawar says government is waiving the loans of defaulters instead of farmers and workers ppd 88 css